Girish Mahajan on Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचे त्यांनी म्हटले. यावरून सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आता अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजनांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 


फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला. त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरुन चर्चा घडवून आणली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह माझ्याकडे धरण्यात आला. मात्र, आपण त्याला नकार दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. 


काय म्हणाले गिरीश महाजन? 


अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावर गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुख इतके दिवस झोपले होते का? आज त्यांना जाग आली तुम्हाला कल्पना आहे का? सीबीआयने त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्यावर दबाव टाकला होता. पण आता सीबीआय चौकशीत सत्य समोर आलंय. हा विषय कुठेतरी भरकटला पाहिजे, म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करतायत, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला आहे.  


गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर निशाणा


देवेंद्र फडणवीसांमुळेच राज्यात डर्टी पॉलिटिक्स, सुरु असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावर गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावं हे मला कळत नाही. हा माणूस किती बायोलॉजिकल आणि अनबायोलॉजिकल आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यांच्या म्हणण्याला कुणीही किंमत देत नाही. ते मोदी, अमित शाहांवर पण बोलतात. कुणावरही टीका करतात. त्यांच्या जिभेला हाड नाही, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 


पुण्यातील पूर परिस्थितीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया 


पुण्यातील पुर परिस्थितीवर गिरीश महाजन म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. महसूल पोलीस यंत्रणा काम करतायत. नैसर्गिक आपत्ती आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पुण्यात पूर आलाय. शासन मदतीच्या बाबतीत कुठेही कमी नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 


आणखी वाचा  


'मविआच्या काळात देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न'; शिंदे गटाचा अनिल देशमुखांवर जोरदार पलटवार