Jalgaon News जळगाव : शहराचे तापमान तीन दिवसांपासून 45 अंशाच्या पुढे जात आहे. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण आहेत. वाढत्या तापमानामुळे (Temperature) वीज वापर वाढला आहे. त्यामुळे वारंवार वीज (Electricity) गुल होत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त भाराची समस्या कमी करण्यासाठी रोज रात्री फिडरनिहाय दीड तास भारनियमन (Load Shedding) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


पिकांसाठी आवश्यक असणारा वीज पुरवठा लोड शेडींगमुळे बंद करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ चोपडा (Chopda) येथील शेतकरी उर्वेश साळुंखे यांनी वीजवितरण कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. गेल्या महिन्याभरापासून तापमान उच्चांकी पातळीवर असल्याने शेती पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. 


महावितरणच्या कार्यालयाच्या दारातच झोपा काढा आंदोलन


विजेची वाढती मागणी वीज वितरणकडून पूर्ण होत नसल्याने वीज वितरण कंपनीकडून अनेक ठिकाणी लोड शेडिंग करत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचा परिणाम म्हणून पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अंवरदे गावातील शेतकरी उरवेश साळुंखे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच कार्यालयाच्या दारातच झोपा काढ आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाची आता जळगावमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


अनेक वीज उपकेंद्रावर नागरिकांची धडक


दरम्यान, जळगावमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यावर लोक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. अनेक वीज उपकेंद्रावरही नागरिक धडक देत आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन महावितरणने एक तातडीची बैठक बोलावून तात्पुरत्या भारनियमानाचा निर्णय घेतला आहे. महावितरण जळगावचे शहर कार्यकारी अभियंता जयंत चोपडे म्हणाले की, अतिरिक्त वीजभार होत असल्यामुळे रात्री एक ते दीड तास तात्पुरते भारनियमन होईल. मात्र, ते गरजेनुसार केले जाईल. ज्या भागात अतिरिक्त वीजभार होत आहे, अशा भागात भार कमी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 


जळगाव शासकीय रुग्णालयात 50 पैकी 16 मृतदेह बेवारस


गेल्या आठ दिवसापासून जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात विविध कारणांनी मृत पावलेले 50 मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. यातील सोळा मृतदेह हे बेवारस असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. ज्या व्यक्तींचे मृतदेह आहे, विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यात उन्हाच्या तीव्रतेने हे मृत पावली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Unseasonal Rain : निसर्ग कोपला! उष्णतेच्या लाटेनंतर वादळी वाऱ्याचा कहर; घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू