Yajuvendra Mahajan ABP Majha Mahakatta : शिक्षणाने माणसाचे जीवन बदलून जाते. त्यामुळं मी यामध्येच काम करण्याचे ठरल्याचे मत दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांसाठी काम करणारे दिपस्तंभचे यजुवेंद्र महाजन (Yajuvendra Mahajan) यांनी व्यक्त केलं. हे काम करत असताना दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी फक्त मार्गदर्शन महत्वाचे नाही तर त्यांच्या निवासाची देखील गरज आहे. अनेक मुलांना चांगली मार्क असतानाही परिस्थितीमुळं शिक्षण घेता येत नव्हते, त्यांना आधार देण्याचे काम केल्याचे महाजन म्हणाले. यजुवेंद्र महाजन यांनी एबीपी माझाच्या माझा महाकट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. 


एका ठिकाणी व्याखानाच्या ठिकाणी दोन दिव्यांग मुलं मला भेटायला आली. ती मुलं म्हणाली सर आम्ही काय करु शकतो का? दिव्यांग व्यक्ती देशात एखाद्या उच्च पदावर का नाही? असे महाजन म्हणाले. मग मी दिव्यांग आणि अनाथ मुलांना देखील शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांच निवासाची व्यवस्था करुन, त्यांना शिक्षण देण्याचे काम सुरु केल्याचे महाजन म्हणाले.


...म्हणून दिव्यांग मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला


एखाद्या दिव्यांग व्यक्तिला जर वाटलं की मला इंजिनीयर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय तर आपल्या देशात तशी व्यवस्थाच नसल्याचे महाजन म्हणाले. हात पाय नसणाऱ्या व्यक्तीला जर वाटलं कुलगुरु व्हावं तर तशी व्यवस्था आपल्याकडे नाही. मी मग ग्रामीण भागातील मुलांबरोबर दिव्यांग आणि अनाथ मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे महाजन म्हणाले. मला यातील काहीही माहित नव्हते. पण एवढं होतं की सर्वात जास्त गरज कोणाला आहे. म्हणून मग त्यांच्यासाठीच काम करण्याचा निर्णय घेतल्याचे महाजन म्हणाले. 


2016 च्या घटनेनं डोळ्यात पाणी आलं आणि ठरवलं


आमचा खरा प्रवास सुरु झाला तो, दिव्यांग मुलं राहायला आणि शिकायला यायली लागली तेव्हा. राहून राहून मी सगळं शिकलो असं महाजन म्हणाले. 2013 नंतर पहिला टप्पा दिव्यांगाचा आला होता. त्यानंतर 2016 ला एक घटना घडली. एक नवीन मुलगा माझ्याकडे आला आणि तो रडायला लागला. मी अनाथ आहे. माझ्या आई वडिलांबाबत मला माहित नाही. मुंबईच्या एका अनाथ आश्रमात राहिलो. आता 18 वर्षाचा झालोय. आता कामाची गरज आहे. पण मला शिकायची खूप इच्छा असल्याचे त्या मुलाने सांगितले. कृपया मला मदत करा असे मुलाने सांगितले. या घटनेनं माझ्आ डोळ्यात पाणी आल्याचे महाजन यांनी सांगितले. त्या दिवसापासून मी निश्चय केला की, 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांचे मायबाप बनायचे असे महाजन म्हणाले. 


अडचणीतून मार्ग निघतो, फक्त तो शोधण्यासाठी प्रयत्न करा


जगात संकटं आणि अडचणी नसणारा एकही माणूस नाही. यातून नक्की मार्ग निघतो, आपण चांगूलपणावर आणि स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे असे मत दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांसाठी काम करणारे दिपस्तंभचे यजुवेंद्र महाजन (Yajuvendra Mahajan) यांनी व्यक्त केलं. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघत असतो, फक्त तो शोधण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं असे मत महाजन यांनी व्यक्त केलं.