नवी दिल्ली : ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी झोमॅटो कंपनी आता ड्रोनने तुमच्यापर्यंत जेवण पोहचवणार आहे. ऑनलाईन फूड डिलीव्हरीसाठी झोमॅटोने हायब्रीड ड्रोनचे परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. फूड डिलीव्हरी करणारे ड्रोन दहा मिनिटांमध्ये पाच किलोमीटर, तर एका तासात 80 किमी इतकं अंतर कापतं.


हवाई वाहतूक मार्ग संचलनालय (डीजीसीए) ने मागील आठवड्यात या ड्रोन्सचं परीक्षण केलं होतं. डीजीसीएकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर झोमॅटोचे ड्रोन्स प्रत्यक्षात येतील. झोमॅटोच्या हायब्रीड ड्रोनने पाच किलो वजनांपर्यंत डिलीव्हरी केली जाऊ शकते. हे ड्रोन्स पूर्णत: स्वयंचलित आहेत.

'एका फूड डिलीव्हरीसाठी सरासरी 30 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र हा वेळ अर्ध्यावर आणायचा असेल, तर रस्ते मार्ग हा जलद पर्याय ठरत नाही. अशावेळी हवाई मार्ग प्रभावी ठरु शकतो. आता झोमॅटोवरुन ड्रोनने जेवण पाठवणं ही सामान्य बाब होईल, असा विश्वास झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी व्यक्त केला.

हे ड्रोन विशेषत: फूड डिलीव्हरीसाठी डिझाईन केले असल्याचं झोमॅटोने सांगितलं. मात्र या ड्रोन्सची चाचणी नेमकी कुठे झाली, याबाबत झोमॅटोने माहिती दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात तुमचं जेवण आकाशातून उडत आलं, तर आश्चर्य वाटायला नको.