नवी दिल्ली : हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या एएन 32 विमानातील सर्व 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विंग कमांडरसह स्क्वॉड्रन लीडर, फ्लाईट लेफ्टनंट यांचा समावेश आहे. हवाई दलाने ट्विटर आज याची माहिती दिली. "वायूदलाच्या आठ जणांचं बचाव पथक आज अपघातस्थळी गेलं होतं. परंतु तिथे कोणीही सापडलं नाही. सर्व मृतांच्या नातेवाईकांना याबाबत कळवलं आहे," असं हवाई दलाने ट्विटरवर सांगितलं आहे. AN-32 | वायुदलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशात आढळले एएन 32 हे विमान 3 जूनपासून बेपत्ता होतं. आसाममधील जोरहाटहून अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात असलेल्या मेनचुका इथे जाण्यासाठी या विमानाने 3 जून रोजी दुपारी 12.25 वाजता 13 जणांसह उड्डाण केलं होतं. मात्र पुढच्या 35 मिनिटांतच विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर भारतीय सैन्यदलाकडून युद्धपातळीवर विमानाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर भारतीय सैन्याच्या Mi 17 हेलिकॉप्टरला बेपत्ता एएन 32 (AN-32) विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील लिपो भागात दिसले होते. हे अवशेष लिपोपासून उत्तरेला 16 किलोमीटरवर, तर अरुणाचल प्रदेशातील तातोपासून ईशान्येकडे 12 हजार फूट उंचावर आढळले आहेत. वायूसेनेचं एएन 32 विमान बेपत्ता, विमानात 5 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स यानंतर आज सकाळी हवाई दलाच्या पथकाने तिथे जाऊन पाहणी केली. परंतु पथकाला कोणीही जिवंत सापडलेलं नाही. यानंतर विमानातील सर्व 13 जणांचा मृत्यू झाल्याचं हवाई दलाने जाहीर केलं. मृतांची नावं 1. विंग कमांडर चार्ल्स 2. स्क्वॉड्रन लीडर एच विनोद, 3. फ्लाईट लेफ्टनंट आर थापा 4. फ्लाईट लेफ्टनंट ए तन्वर 5. फ्लाईट लेफ्टनंट एस मोहंती 6. फ्लाईट लेफ्टनंट एमके गर्ग 7. वॉरंट ऑफिसर केके मिश्रा 8. सार्जंट अनुप कुमार 9. कॉर्पोरल शेरीन 10. लीडिंग एअरक्राफ्टमन एस के सिंह 11. लीडिंग एअरक्राफ्टमन  पंकज 12. एनसी (ई) पुतली 13. एनसी(ई) राजेश कुमार