Zomato food delivery agent scam : तुम्ही अनेकदा झोमॅटोवरून अन्नाची ऑर्डर (Zomato food delivery) केली असेल आणि डिलिव्हरी एजंटच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागले असेल. एका यूजरने डिलिव्हरी एजंटच्या फसवणुकीचा खुलासा केला आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. उद्योजक विनय सती यांनी सोशल मीडिया पोस्टवर पोस्ट केल्यामुळे या सगळ्याचा खुलासा झाला. झोमॅटोच्या एका डिलिव्हरी एजंटने त्यांना पुढील वेळेपासून ऑनलाइन पैसे देऊ नका असं सांगितले आणि फक्त 200 ते 300 रुपये देऊन 1000 रुपयांचे जेवण मिळवा अशी ऑफर दिली.


ही बाब समोर आल्यानंतर झोमॅटो कंपनी या डिलिव्हरी एजंटशी संबंधित घटनेची चौकशी करत आहे. सीईओ दीपिंदर गोयल यांनी सांगितले आहे की, या फसवणुकीसंदर्भात आम्हाला माहिती मिळाली आहे आणि आम्ही याबाबत चौकशी करत आहोत.  


काय प्रकरण आहे?


तक्रारदार विनय सती यांनी ट्विट केले की, मी काही दिवसांपूर्वी झोमॅटोकडून बर्गर मागवला होता आणि जेव्हा एजंट जेवण देण्यासाठी आला तेव्हा तो म्हणाला, "सर, पुढच्या वेळी ऑनलाइन पैसे देऊ नका. जेव्हा तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे 1000 रुपये भराल तेव्हा तुम्हाला फक्त 200 रुपये द्यावे लागतील. मी झोमॅटोला दाखवेन की तुम्ही ऑर्डर घेतली नाही. अशाच पद्धतीने तुम्ही फक्त 200-300 रुपयांमध्ये एक हजार रुपयांच्या खाण्याचा आनंद मिळेल.




दोष दूर करण्याचा प्रयत्न करु


झोमॅटो डिलिव्हरी एजंट्सचे हे विधान ऐकून मला धक्का बसला, असं विनय सती यांनी म्हटलं आहे. कंपनीचे सीईओ दीपेंद्र गोयल यांना टॅग करत विनय सती यांनी म्हटलं आहे की, तुम्हाला याविषयी माहिती नाही असे तुम्ही आता म्हणू नका आणि हे सगळं कळूनही जर तुम्हाला ते सोडवता येत नसेल तर तुमची आयआयएमचे विद्यार्थी असलेले कर्मचारी काय करत आहेत. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. विनय सती यांनी म्हटलं की, लक्षात घ्या की या सगळ्यानंतर माझ्याकडे दोन पर्याय होते. पहिला पर्याय हा की मी या ऑफरचा आनंद घेईन आणि दुसरा पर्याय हा की, मी हा घोटाळा उघड करीन. एक उद्योजक असल्याने मी दुसरा पर्याय निवडला, असं विनय सती म्हणाले.


वापरकर्त्याला प्रतिसाद देताना झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल म्हणाले की, मला आपल्याला झालेल्या त्रासाची जाणीव आहे. ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करु असं त्यांनी तक्रारकर्ते विनय सती यांना आश्वासन दिलं आहे.


याआधीही एजंट ऑनलाइन खाद्यपदार्थ डिलिव्हरी करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. कधी या एजंटांनी ऑर्डर केलेले अन्न खाल्ले, तर कधी ग्राहकांशी गैरवर्तन केल्याची प्रकरणं अनेकदा घडली आहेत.