चंदीगड: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आज 39 वर्षाचा झाला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्याने यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करताना युवराज सिंगने म्हटलं आहे की शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण होवोत. त्याच सोबत आपले वडील योगराज सिंह यांच्या वक्तव्यावर त्याने नाराजी व्यक्त करत ते वक्तव्य निराशाजनक असल्याचं सांगितलं आहे.
युवराज सिंहने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक संदेश लिहला आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, "प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करण्याची संधी असते. आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून मार्ग निघावा अशी माझी इच्छा आहे."
युवराज सिंगने शेतकऱ्यांचा देशाची लाईफलाइन असा उल्लेख केला. त्याने म्हटले आहे की, "शेतकरी आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो."
वडिलांचे वक्तव्य निराशाजनक
युवराज सिंगने आपल्या वडिलांनी केलेलं वक्तव्य निराशाजनक असल्याचं सांगत त्यावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, "मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. योगराज सिंह यांचं वक्तव्य अत्यंत निराशाजनक आहे आणि त्याचा माझ्याशी काही संबंध नाही."
काय म्हणाले होते युवराजचे वडील?
काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेले युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी हिंदूंच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. पंजाबी भाषेत त्यांनी केलेल्या भाषेत त्यांनी महिलांच्याबद्दलही आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.
अजूनही कोरोनाचं संक्रमण कमी झालं नसून प्रत्येकाने काळजी घ्यावी असंही त्यानं सांगितलंय. युवराज सिंह एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. त्याने 2019 साली क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. भारतीय संघासाठी त्याने आतापर्यंत 40 कसोटी, 304 एकदिवसीय सामने आणि 54 टी20 सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या: