नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असललेल्या आंदोलनाचा आज सोळावा दिवस. या आंदोलनाचं आणि भाजपमधल्या हरियाणा सरकारच्या भवितव्याचंही एक कनेक्शन आहे. त्यासंदर्भात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या दुष्यंत चौटाला यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. एकीकडे शेतकरी आंदोलन तापत चाललंय, तसतसं हरियाणामधल्या भाजप सरकारचीही चिंता वाढत चाललीय. कारण ज्या दुष्यंत चौटाला यांच्या पाठिंब्यावर भाजपनं हरियाणात पुन्हा सरकार स्थापन केलं, ते काय भूमिका घेणार यावर सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून दुष्यंत यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या आमदारांचा दबाव वाढत चालला आहे. त्यात दुष्यंत चौटाला यांनी 'जोपर्यंत एमएसपी आहे तोपर्यंत मी सरकारसोबत' असे वक्तव्य केलं.
दुष्यंत चौटाला एकीकडे सरकारनं दिलेल्या लिखित प्रस्तावात एमएसपीचं आश्वासनही देत आहेत. दुसरीकडे तसं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशाराही देत आहेत. साहजिक आहे त्यांना खुर्चीही वाचवायची आहे आणि शेतकऱ्यांसोबत असल्याचं चित्रही उभं करायचं आहे.
हरियाणामधल्या राजकीय अस्थिरतेचं शेतकरी आंदोलनाशी कनेक्शन
हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 40 तर काँग्रेसनं 31 जागा जिंकल्या. दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष ज्याच्याकडे जाणार त्यांचं सरकार बनणार अशी स्थिती होती. दुष्यंत यांनी भाजपला समर्थन द्यायचा निर्णय घेतला. पण ज्या शेतकऱ्यांच्या मुद्दयावर त्यांचा पक्ष लढतो ते शेतकरीच कायदयाच्या विरोधात असल्यानं त्यांची अडचण वाढली आहे.10 पैकी 5 आमदार हे आंदोलनाच्या बाजूनं भूमिका घेण्याच्या मताचे आहेत.
साहजिक आहे आंदोलन उग्र होत गेलं तर दुष्यंत चौटाला यांच्यावरचा दबाव वाढत जाईल. दुष्यंत यांनी सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतलाच तर भाजपचं हरियाणा सरकार धोक्यात येऊ शकतो. शेतकरी आंदोलनाच्या वाटाघाटी करत असताना भाजप श्रेष्ठींना या गोष्टीचा देखील विचार समोर ठेवावा लागणार आहे.
आंदोलन सुरु झाल्यापासून दुष्यंत चौटाला हे काहीच बोलत नव्हते. काल हरियाणात भाजप आणि जेजेपीच्या आघाडीची एक बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या शेजारी उभं राहूनच दुष्यंत चौटाला यांनी हे विधान केलं. आंदोलनाची आग सर्वाधिक पंजाब आणि हरियाणातच आहे.अशा वेळी हे आंदोलन मनोहर लाल खट्टर यांची खुर्चीही गिळंकृत करणार का हे पाहावं लागेल.