नवी दिल्ली : 'टिक टॉक'वर व्हिडीओ तयार करणं दिल्लीतील एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. व्हिडीओ शूट करताना बंदुकीतून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंदूक घेऊन टिक टॉकवर व्हिडीओ तयार करताना हा सगळा प्रकार घडला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान नावाचा तरुण त्याचे मित्र सोहल आणि आमिर यांच्यासोबत दिल्लीतील इंडिया गेट येथे गेला होता. गाडीमध्ये सलमान सोहेलच्या शेजारी बसला होता. त्यावेळी सोहेलने एक गावठी कट्टा बाहेर काढला आणि टिक टॉकवर व्हिडीओ बनवू लागला. दरम्यान त्याने बंदूक सलमानच्या चेहऱ्यावर रोखली.


मात्र दुर्दैवानी बंदुकीतून गोळी सुटली आणि सलमानच्या चेहऱ्यावर लागली. दिल्लीच्या बारखंभा रोडवरील रणजीत सिंह फ्लायओव्हरवरजवळ ही घटना घडली. घटनेनंतर गाडीत बसलेले सोहेल आणि आमिर घाबरले. त्यांनी दरियागंज येथील सोहेलच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन आधी रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि त्यानंतर सलमानला उपचारासाठी जवळील एलएनजेपी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांना उपचारापूर्वी सलमानला मृत घोषित केलं.


याप्रकरणी बाराखंभा पोलिसांनी आर्म्स अॅक्ट आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आमिर आणि सोहेलसह शरीफ नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


VIDEO | उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत मोदी-मोदीच्या घोषणा