लखनौ : आचारसंहितेचं उल्लंघन करत धर्माच्या नावावर मतं मागणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपा प्रमुख मायावती यांना चांगलच महागात पडलं आहे. निवडणूक आयोगाने मायवती यांना दोन दिवस तर योगींना तीन दिवस निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे.


निवडणूक आयोगाच्या कारवाईमुळे या दोन्ही नेत्यांना कोणताही रोड शो करता येणार नाही किंवा निवडणूक प्रचार सभाही घेता येणार नाहीत. तसेच रोड शोमध्येही भाग घेता येणार नाही. याशिवाय त्यांना सोशल मीडियाचा वापर किंवा कोणाला मुलाखातही देता येणार नाही.


निवडणूक आयोगाच्या कारवाईची अमंलबजावणी 16 एप्रिलला सकाळी 6 वाजेपासून सुरु होणार आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ 16, 17, 18 एप्रिलला आणि मायावती 16, 17 एप्रिलला कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रचार करु शकणार नाहीत.


योगी आदित्यनाथ यांनी 9 एप्रिल रोजी मेरठ येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता. तर मायावती यांनी 7 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथील देवबंद येथील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर निवडणूक आयोगाकडे यासंबंधी तक्रार आल्यानंतर दोन्ही नेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.