मुंबई: रेस्क्यू रिसर्च अँड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्टने शहरातल्या ३० इंग्रजी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून सळसळणाऱ्या तरुणाईचं वेगळं रुपही समोर आलं आहे. सर्वेक्षणातील ४० टक्के तरुणांनी पॉर्न व्हिडीओतही खास करुन बलात्काराचे व्हिडीओ पाहणं आवडत असल्याचं म्हटलं. त्याहून धक्कादायक म्हणजे सर्वेक्षणातील ६३ टक्के युवकांनी तर थेट सामूहिक बलात्कारात भाग घेण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.


देशात महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, बलात्कार यांच्या बातम्या आता रोजच्या झाल्या आहेत. या मागे प्रामुख्याने विविध माध्यमातून सहज उपलब्ध होणारी लैंगिकदृष्ट्या उत्तेजक दृष्यसामुग्री (पॉर्न कन्टेंट) कारणीभूत ठरत असल्याची टीकाही होते. खासकरुन मोबाईल स्मार्ट फोनमुळे तर पॉर्न व्हिडीओ कुठेही बघणं शक्य होतं. मात्र, उमलत्या वयातली तरुणाई या पॉर्नच्या कचाट्यात तर पडत नाही ना, असा प्रश्न या सर्वेक्षणामुळे पडतोय. रेस्क्यू रिसर्च अँड ट्रेनिंग चेरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक क्लिफोर्ड यांचं संशोधन त्यामुळेच आपले डोळे उघडणारं ठरतं. अभिषेक इंग्लडवासी आहेत आणि या विषयावरील संशोधनासाठी ते भारतात आले. या सर्वेक्षणासाठी त्यांनी शहरातील ३० इंग्रजी कनिष्ठ महाविद्यालयं निवडली. त्यातील निवडक तरुणांना लैंगिकतेविषयी २० कठीण प्रश्न विचारले गेले.


या प्रश्नांच्या उत्तरांमधून समोर आलंय ते एक हिडीस आणि विकृत वास्तव. सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या युवकांनी हे कबूल केलं की, शरीरसुखाच्या अनुभवासाठी त्यांना हार्डकोर पॉर्न बघणं आवडतं. इतकंच नाही तर, कामुक संदेशन-सेक्स्टिंग, अनैसर्गिक-हिंसक शरीरसंबंधांबद्दल आकर्षण, किशोर किंवा बाल वयातील मुला-मुलींचे पॉर्न पाहणं, वेश्यागमनाची इच्छा अशा प्रवृत्तीही त्यांच्यात आढळून आल्या. काळजीची बाब म्हणजे या तरुणांना बलात्काराबद्दल खास आकर्षण वाटत होतं. काहींना तर सामूहिक बलात्कारात सहभागी होण्याचीही इच्छा होती. या सर्वेक्षणातील ४० टक्के मुलांना हिंसक पॉर्न पाहणं आवडत होतं. म्हणजेच, दर आठवड्याला ४० रेप व्हिडीओ! अंदाजच लावायचा म्हटला तर मुंबईतील महाविद्यालयीन तरुण दरदिवशी सुमारे २० लाख रेप व्हिडीओ पाहतात. यातील ६३ टक्के तरुणांना तर प्रत्यक्ष बलात्कार करण्याचीही इच्छा होत होती.


याहून गंभीर गोष्ट म्हणजे अशा तरुणांकडून वेश्यागमनाचा मार्गही अवलंबला जात आहे. सर्वेक्षणातील २६ टक्के मुलांनी वास्तवात वेश्यागमनाचा मार्ग पत्करला. सर्वेक्षणातील ४६ टक्के तरुणांना चाईल्ड पॉर्न बघण्यात रस असल्याचं आढळलं. अशा प्रवृत्तीमुळेच मुंबईत किशोरवयीन वेश्यांची संख्या ९ हजार झाल्याचं निरीक्षण अभिषेक यांनी मांडलं. या सर्वेक्षणाबद्दल मानसोपचारतज्ज्ञांशीही 'एबीपी माझा'ने संवाद साधला. त्यांनीही सोदोदित पॉर्न पाहिल्याने युवकांच्या मनावर परिणाम होत असल्याचं आणि त्यांना त्या व्हिडीओतील अतिरंजित गोष्टी करण्याची इच्छा होत असल्याचं मत मांडलं.


सध्या महाजालावर (इंटरनेट) २ कोटींपेक्षा जास्त पॉर्नसाईट्स आहेत. त्याशिवाय, मोबाईलवर आधीच जमा करुन ठेवलेल्या (डाऊनलोड) चित्रफितीही पाठवल्या आणि घेतल्या जातात. याचा काहीच हिशोब नसतो. पॉर्नसाईट्सवर सरसकट बंदी घालणं अशक्य आहे. अशावेळी घरात आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये तरुणाईशी संवाद साधणं. आरोग्यदायी लैंगिकतेविषयी त्यांची धारणा बनवणं हेच पर्याय समाजाच्या हाती आहेत.