बंगळुरु : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज बंगळुरू येथून भारतीय बनावटीच्या तेजन लढाऊ विमानातून उड्डाण घेतलं. तेजसमधून उड्डाण घेणारे राजनाथ सिंह पहिल संरक्षण मंत्री ठरले आहेत. राजनाथ सिंह यांनी तेजस विमानाच्या मागच्या सीटवर बसून जवळपास अर्धा तास उड्डाण घेतलं. आपल्या सैन्याचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.


"मी आज खूप उत्साही आहे. मी जवळपास अर्धा तास तेजसमध्ये उड्डाण केले. यावेळी मी तेजस विमानाने हवेत केलेली प्रात्यक्षिकेदेखील पाहिली. भारतात तयार झालेलं तेजस विमान आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत. तेजसमधून उड्डाण करण्याचा अनुभव शानदार होता", असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.





लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस विमानाची निर्मिती केली आहे. तेजस विमानाची निर्मिती बंगळुरुमध्ये केली जाते. लवकरच तेजस विमान भारतीय नौसेनेत दलात दाखल होणार आहे. त्यासाठीची तपासणी सध्या गोव्यात सुरु आहे.


हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडने जवळपास 16 तेजस विमानांची निर्मिती आतापर्यंत करुन वायू सेनेला दिली आहे. त्यापैकी 12 विमाने तामिळनाडू येथील सुलूर एअरबेसवरील डॅगर्स स्क्वॉड्रनमध्ये सामील झाले आहेत. लवकरच 40 तेजस विमानं वायूसेनेच्या ताफ्यात सामील होणार आहेत.



तेजस विमानाची वैशिष्टे




  • तेजस दोन आसन क्षमता असलेलं लढाऊ विमान आहे.

  • तेजसमध्ये निश्चित लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्याची क्षमता आहे.

  • हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास हे लढाऊ विमान सक्षम आहे.

  • अन्य लढाऊ विमानांच्या तुलनेत तेजस वजनाने हलकं आहे.

  • तेजस विमान 50 हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकतं.