पुणे : पुण्यातल्या एका तरुणाला थेट काँग्रेसचा अध्यक्ष व्हायची इच्छा आहे. यासाठी त्याने संपूर्ण तयारी केली आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे उद्या हा तरुण काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व घेणार आहे. त्यानंतर लगेच काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे अध्यक्षपदासाठीचा अर्ज देणार आहे. गजानंद चंद्रकांत होसाळे (वय 28) असं या तरुणाचे नाव आहे.


गजानंद होसाळे हा तरुण कर्नाटकातील बिदर येथील आहे. इंजिनिअरिंगपर्यंत त्याचं शिक्षण झालं आहे. सध्या तो भोसरीतील एका कंपनीत काम करत आहे. "माझी आणि काँग्रेसची विचारसरणी जुळते आहे, म्हणूनच मी अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहे", असं त्या तरुणाने सांगितलं आहे.

अध्यक्षच का, इतर पद का नको? असं या तरुणाला विचारलं. त्यावर त्याने, नेता किंवा कार्यकर्ता होऊन बदल घडविणे अशक्य आहे, पण अध्यक्ष झाल्यानंतर बदल घडविणे शक्य आहे. मी जर नेता किंवा कार्यकर्ता झालो तर माझ्या कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणता येणार नाहीत. पण जर मी अध्यक्ष झालो तर माझ्या कल्पना मी पक्षातील इतरांना सांगू शकतो, त्यांना तसे करायला भाग पाडू शकतो. त्यामुळे मला अध्यक्षच व्हायचं आहे. मी आल्यानंतर काँग्रेस दिवस बदलतील. आमची सत्ता स्थापन करण्यासाठी मी अथक प्रयत्न करेन", असेही गजानंद होसाळे याने सांगितले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. देशभरात त्यांचे केवळ 52 खासदार निवडून आले. या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याला एक महिना झाला तरी काँग्रेसला अध्यक्षपद स्वीकारणारी व्यक्ती मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही स्थिती पाहुनच गजानंद होसाळे याने काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे ठरवले. त्याच्या या अर्जाची काँग्रेस पक्ष दखल घेईल का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.