पणजी : दाबोळी विमानतळावर रविवारी 56 लाख 38 हजार रुपये किमतीचे 1 किलो 787 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम खात्याच्या गोवा विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवीईत ताजिकीस्तानच्या तिघा महिलांना ताब्यात घेतले.


गोवा कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार 56 लाख 38 हजार रुपये किमतीचे हे सोने दुशांबे- ताजिकिस्तान येथून एअर इंडियाच्या विमानातून बेकायदेशीरपणे भारतात आणण्यात आले होते. दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या पथकाला याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे या पथकाने हवाई प्रवाशांवर पाळत ठेवली होती.

मुंबई | टीसीला शंका आली, प्रवाशाला तपासलं, 17 कोटीचं सोने सापडलं!



कस्टमच्या अधिकाऱ्यांना सकाळी ताजिकिस्तान येथून दुबईमार्गे भारतात दाखल झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील तिघा महिला प्रवाशांबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी या महिलांच्या सामानाची तपासणी केली असता त्यांच्याकडे तस्करीचे सोने सापडले. तस्करीचे सोने या महिलांनी आपल्या पर्समध्ये, बॅगामध्ये, इतर काही वस्तूमध्ये आणि आपल्या अंतवस्त्रांमध्येही लपवले होते. या कारवाईत कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हे सर्व सोने जप्त करुन महिलांनाही ताब्यात घेतले. त्यांनी विदेशातून भारतात आणलेले सोने 1 किलो 787 ग्रॅम वजनाचे असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 56 लाख 38 हजार रुपये आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही महिला ताजिकिस्तानच्या नागरीक आहेत. त्यांची अधिक चौकशी करण्यात येत आहे. गोवा कस्टम विभागाचे उपायुक्त डॉ. पी. राघवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे. मागच्या एप्रील महिन्यापासून आतापर्यंत 1 कोटी 4 लाख व 85 हजार रुपये किमतीचे तस्करीचे सोने दाबोळी विमानतळावर पकडले आहे.