नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवर आता पॅन कार्ड नंबर आधार कार्डला जोडण्यासाठी दबाव वाढत आहे. आता पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत.
केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.
2017-18 च्या आर्थिक विधेयकाच्या कर प्रस्तावामध्ये दुरुस्ती करुन, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. याशिवाय पॅन कार्ड आधारशी जोडणंही बंधनकारक केलं होतं.
1 जुलैपासून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि नव्या पॅन कार्डसाठी 12 अंकांचा आधार क्रमांक देणं अनिवार्य होणार आहे. आधार कार्डद्वारे मिळणाऱ्या बायोमेट्रिक सुविधेमुळे आयकर विभागाला करातील फेरफार शोधण्यास सोपं जाईल. तर करचोरी आणि एकापेक्षा जास्त पॅन क्रमांकाच्या अडचणीवर मात करता येईल.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्यानंतर देशातील सामान्य नागरिकाद्वारे खर्च होणाऱ्या पैशांचा संपूर्ण आकडा आयकर विभागाकडे पोहोचेल. यामुळे ते करासंबंधित नवे नियम आणि कायदे बनवता येतील, जेणेकरुन देशात टॅक्स बेस वाढवण्यास मदत होईल.
देशात पॅन कार्ड धारकांची संख्या 25 कोटी आहे, तर 111 कोटी लोकांना आधार कार्ड क्रमांक देण्यात आला आहे. यापैकी केवळ 2.87 नागरिकांनी 2012-13 दरम्यान कर भरला होता. या 2.87 कोटी नागरिकांमध्ये 1.62 कोटी लोकांनी टॅक्स रिटर्न दाखल केलं, पण एक रुपयाचाही कर भरलेला नाही. लोक मोठ्या संख्याने करचोरी करतात किंवा कर देण्याचं टाळतात.
पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस:
आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधारकार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे.
UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.