मुंबई : औषधाची एखाद-दुसरी गोळी घ्यायची आवश्यकता असताना संपूर्ण पाकीट घेण्याची सक्ती मेडिकल दुकानदाराकडून केली जाते. मात्र आता औषधांची छोटी पाकिटं तयार करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्यांना दिले आहेत.
औषधांचं मोठं पाकीट विकत घेण्याऐवजी लवकरच रुग्णांना गरजेनुसार छोट्या आकाराची पाकिटं खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे अख्खं पाकीट विकत घेण्याची सक्ती रुग्णांना करावी लागणार नाही. एफडीएने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला पत्र पाठवून औषधांची छोटी पाकिटं तयार करण्याचं निवेदन दिलं होतं.
अनेक वेळा रुग्णांना कमी मात्रा घेण्याची आवश्यकता असते. मात्र औषध विक्रेत्यांना औषधांच्या स्ट्रिप्स कापणं शक्य नसतं. औषधांच्या स्ट्रिप्स कापल्यामुळे बऱ्याचदा त्या पाकिटावरील तारीख, बॅच क्रमांक, एक्स्पायरी डेट कापली जाण्याची शक्यता असल्यामुळे मेडिकल दुकानदार ही जोखीम घेत नाहीत.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला संपूर्ण माहिती असलेली औषधांची छोटी पाकिटं बनवण्यासंबंधात पत्र लिहिलं आहे. या निर्णयामुळे औषधांचा अपव्यय आणि दुष्परिणाम होण्याला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.