लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्या सहा महिन्यातील कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. गेल्या सहा महिन्यात उत्तर प्रदेशातील लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून विकास कार्यांना वेग आला असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.


योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसह सरकारच्या सहा महिन्यातील कामकाजावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन केलं. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दिवस रात्र एक करुन उत्तर प्रदेशच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. येत्या काळात या आराखड्यावर काम केलं जाणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

मार्च 2017 पूर्वी उत्तर प्रदेशात जंगलराज होतं. हे संपवणं सरकारची प्राथमिकता होती. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यात उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही. अन्यथा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात प्रत्येक आठवड्याला सरासरी दोन दंगलीच्या घटना होत होत्या, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

गेल्या सहा महिन्यात पोलीस आणि आरोपींमध्ये 431 चकमकीच्या घटना घडल्या. ज्यामध्ये 17 जणांचा खात्मा करण्यात आला. 668 वाँटेड गुन्हेगारांसह 1106 जणांना अटक करण्यात आली. सोबतच 69 गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यात आली, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांसाठी सरकारने एक लाख रुपयांपर्यंत पीक विमा योजना सुरु केली आहे. शिवाय राज्यात पहिल्यांदाच 37 लाख टन गहू थेट खरेदी करण्यात आला आणि बटाटा खरेदीसाठीही पहिल्यांदाच योग्य दर घोषित करण्यात आला, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.