Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडीयमवर हा भव्य शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान, योगी यांच्यासोबत आज 46 जणांना मंत्रीपदाची शपथ दिली जाऊ शकते. ज्यामध्ये सात महिलांचाही समावेश असेल, अशी सुत्रांकडून माहिती मिळत आहे. तसेच जुने उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा या दोघांचेही मंत्रीमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
योगींच्या मंत्रिमंडळात तरुणांना मिळणार संधी?
यावेळी योगी मंत्रिमंडळात तरुणांना अधिक संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात 45 ते 55 वयोगटातील तरुणांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. त्याचबरोबर 70 वर्षांवरील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही. आयएएस, आयपीएस, डॉक्टर, वकील आणि सीए यांसारख्या व्यावसायिक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात येणार आहे. सात महिलांना मंत्री केले जाऊ शकते. त्याचबरोबर खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांनाही डावलण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
योगींच्या नव्या मंत्रिमंडळात केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत. ते केवळ मंत्रिमंडळात परत येऊ शकत नाहीत, तर त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकते. दुसरीकडे, भाजपचे आमदार महेंद्र सिंह आणि माजी पोलीस अधिकारी असीम अरुण यांचीही मंत्रीमंडळात वर्णी लागू शकते.
उत्तर प्रदेशच्या इतिहासात तीन दशकांहून अधिक काळानंतर अशी संधी चालून आली आहे, की एखादा मुख्यमंत्री दुसऱ्या टर्मची पुनरावृत्ती करणार आहे. भाजपला मिळालेल्या मोठ्या जनादेशामुळे हे सर्व शक्य झाले आहे. त्यामुळं या ऐतिहासिक विजयानंतर योगींचा आजचा शपथविधी सोहळाही ऐतिहासिक ठरणार आहे.
योगी आदित्यनाथ आज सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. इकाना स्टेडीयमवर हा भव्य शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काल लखनौ येथील लोकभवनात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. निरीक्षक म्हणून आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत योगी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.