नवी दिल्ली : लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता पैलवान योगेश्वर दत्त लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विशेष म्हणजे योगेश्वरनं हुंडा नाकारुन नवा आदर्श घातला आहे. शुभशकुन म्हणून केवळ एक रुपये हुंडा स्वीकारण्याचा पायंडा योगेश्वरने घातला आहे.
हरियाणातले काँग्रेसचे नेते जयभगवान शर्मा यांची लेक शीतल शर्मा हिच्यासोबत योगेश्वरचा साखरपुडा शनिवारी संपन्न झाला. सोमवारी या दोघांच्या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुलींच्या लग्नासाठी आईवडिलांना करावी लागणारी पैशाची जुळवाजुळव मी पाहिली आहे. त्यामुळे मोठं होतानाच मी दोन निर्णय घेतले. एक म्हणजे मी कुस्तीत देशाचं नाव रोशन करणार आणि दुसरं म्हणजे हुंडा स्वीकारणार नाही. पहिलं स्वप्न आधीच साकार झालं होतं, आता दुसरं होतंय, असं योगेश्वर म्हणाला.
शुभशकुन म्हणून योगेश्वरच्या कुटुंबीयांनी साखरपुड्यात केवळ एक रुपयाचं नाणं स्वीकारलं. नातेवाईकांना याव्यक्तिरिक्त कोणतंही गिफ्ट देऊ नका, अशी विनंती त्याने केली आहे. काही जणांनी मात्र एक रुपया तरी का स्वीकारला, असे बोचरे सवाल त्याला ट्विटरवर विचारले आहेत.