दंतकथेतील हिममानवाच्या पावलांचे ठसे आढळले, भारतीय सैन्याचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2019 07:28 AM (IST)
गिर्यारोहण मोहिमा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या पथकाने रहस्यमय वाटणाऱ्या भल्या मोठ्या पावलांचे ठसे पाहिल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'यती' म्हणजेच पुराणकथांमधील दैत्याच्या पावलांचे 32 गुणिले 15 इंच आकाराचे ठसे पहिल्यांदाच पाहण्यात आल्याचा दावा सैन्याने केला आहे.
मुंबई : बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या हिममानवाबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. मात्र पहिल्यांदाच भारतीय सेनेने हिममानव प्रत्यक्षात असल्याची शक्यता अधिकृतपणे वर्तवली आहे. बर्फामध्ये दिसणाऱ्या हिममानवाच्या पाऊलखुणांचे फोटो सैन्याने ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहेत. गिर्यारोहण मोहिमा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या पथकाने रहस्यमय वाटणाऱ्या भल्या मोठ्या पावलांचे ठसे पाहिल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'यती' म्हणजेच पुराणकथांमधील दैत्याच्या पावलांचे 32 गुणिले 15 इंच आकाराचे ठसे पहिल्यांदाच पाहण्यात आल्याचा दावा सैन्याने केला आहे. नेपाळ-चीन सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ 9 एप्रिल 2019 ला ही गोष्ट सैन्याच्या निदर्शनास आली. या भागात आढळणाऱ्या कुठल्याच प्राण्याच्या पावलांचे ठसे या आकाराचे नसल्यामुळे भारतीय सैन्य चाट पडलं आहे. मकालू-बारुन नॅशनल पार्कच्या याच परिसरात पूर्वीही हिममानवाचं ओझरतं दर्शन घडल्याचा दावा करण्यात आला होता. 'यती'चं वर्णन दोन पायांवर चालणारा अवाढव्य वानर अशा स्वरुपात केलं जातं. तो मानवाचा पूर्वज मानला जातो. 1832 साली पहिल्यांदा एका गिर्यारोहकाने उत्तर नेपाळमध्ये दोन पायांवर चालणारं महाकाय वानर पाहिल्याचा दावा केला होता. त्यामुळे दंतकथांमधून आढळणारा हिममानव गांभीर्याने घेतला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. VIDEO | हिममानवाच्या पावलांचे ठसे आढळले, भारतीय लष्कराचा दावा | एबीपी माझा