कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आमदार खरेदी-विक्रीचे आरोप केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तृणमूलचे 40 आमदार आपल्या संपर्कात असल्याचं नरेंद्र मोदींनी कोलकातातील प्रचारसभेत म्हटलं होतं.


ब्रायन यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "एक्सपायरी बाबू पीएम, आपण सरळ चर्चा करु. तुमच्यासोबत कुणीही येणार नाही. आमचा एक आमदारही येणार नाही. तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत आहात की खरेदी विक्री करत आहात. तुमच्या कार्यकाळ समाप्तीची तारीख जवळ येत आहे. तुमच्यावर खरेदी-विक्रीचे आरोप असून आज आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत."





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये सोमवारी एका निवडणूक प्रचारसभेत सहभागी झाले होते. तृणमुल काँग्रेसचे 40 उमेदवार आपल्या संपर्कात आहेत. निवडणुकीत भाजप विजयी झाल्यानंतर हे 40 आमदार तृणमुल काँग्रेसला राम राम ठोकणार आहेत, असं मोदींनी म्हटलं.


तुमच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीकाही मोदींनी ममता बॅनर्जींवर केली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 2014 मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना मोठा रसगुल्ला म्हणजे भोपळा मिळेल अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.


VIDEO | राजकीय फायद्यासाठी नरेंद्र मोदी जात लपवत आहेत, मायावतींचा आरोप | एबीपी माझा