नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरील निर्बंध हटवल्याने बँकेच्या सर्व खातेदारांना दिलासा मिळाला आहे. सरकारने येस बँकेसाठी नवीन धोरण आखल्याने 13 दिवसानंतर बँकेवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. बँकेच्या सर्व सेवाही सुरळीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता खातेधारकांना 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार आहे. येस बँकेने टि्वटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. “आमच्या सर्व बँकिंग सेवा सुरु झाल्या आहेत. आपण आमच्या सेवेचा लाभ घेऊ शकता. संयम आणि सहकार्याबद्दल धन्यवाद” असे येस बँकेने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


ग्राहकांना एटीएम, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या सुविधा पूर्वीप्रमाणे वापरता येणार आहेत. पाच मार्चला येस बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. त्यानंतर बँकेच्या खातेदारांना 50 हजारपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. सरकारने मागील आठवड्यात पुनर्रचना योजनेस अधिसूचित केले होते. तसेच स्टेट बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली होती.


मंगळवारी संध्याकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत येस बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध 18 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून हटवण्यात येतील आणि सामान्य कामकाजाला सुरूवात होईल, अशी माहिती स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली होती.


येस बँकेच्या खातेदारांचे पैसे कौटुंबिक स्वार्थासाठी वापरले?



काय आहे प्रकरण?


रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरती आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार 3 एप्रिलपर्यंत येस बँकेचे ग्राहक केवळ 50,000 रुपये काढू शकणार होते. तर एका महिन्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. येस बँक कोणतेही नवीन कर्ज वितरित करण्यास किंवा गुंतवणूक करण्यास सक्षम राहणार नाही. त्याचबरोबर देशाच्या सर्वात मोठ्या बँक एसबीआयच्या संचालक मंडळाने रोकडसंगतीचा सामना करीत येस बँकेत गुंतवणूक करण्यास 'तत्वत: मान्यता' दिली आहे. दरम्यान, आयुष्यभराची जमापुंजी फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरुपात बँकेत ठेवली होती. मात्र, आता आपले पैसे परत मिळणार की नाही या चिंतेपोटी खातेदारांची झोप उडाली. मात्र आज काहीसा दिलासा खातेदारांना मिळाला आहे.