नवी दिल्ली: कोरोना व्हायरसची लागण विदेशात राहणाऱ्या 276 भारतीय नागरिकांना झाली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत दिली आहे. यात कोविड 19 ची लागण झालेले सर्वाधिक 255 भारतीय नागरिक हे इराणमध्ये असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. लोकसभा दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितलं की, 255 भारतीय नागरिक इराण, संयुक्त अरब अमिरातमध्ये 12,इटलीत 5, श्रीलंका, श्रीलंका, हॉन्गकॉन्ग, रवांडा, कुवैत मध्ये प्रत्येकी एका भारतीय नागरिकाला कोविड 19 ची बाधा झाली आहे.


इराणमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या भारतीयांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी भारतीय दूतावासची टीम काम करत आहे. तसेच इराण सरकारसोबत यासंदर्भात भारत सरकार सातत्याने संपर्कात देखील आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे इराणमध्ये हजाराहून अधिक भारतीय असे आहेत जे भारतात परत येऊ इच्छित आहेत. आज एका विमानाने जवळपास 201 भारतीयांना सर्व तपासण्या करुन भारतात आणलं गेलं आहे. भारतात आतापर्यंत इराण, इटली आणि चीनसह अन्य देशांमधून 1600 हून अधिक भारतीयांना परत आणले गेले आहे.

फिलिपाइंस आणि मलेशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना आणि खासकरुन विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात तयार केलेलं कोविड19 सेल काम करत आहे. या दोन्ही देशातील दूतावासांशी संपर्क सुरु असल्याचे जयशंकर यांनी सांगितलं.

देशात 147 जणांना कोरोनाची लागण
देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज देशभरात कोरोनाचे नवीन दहा रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 147 कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये 122 भारतीय आहेत, 25 परदेशी नागरिक आहेत तर 14 लोकांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे.

राज्यात रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती

  • पुणे - 8

  • पिंपरी-चिंचवड - 10

  • मुंबई - 7

  • नागपूर - 4

  • यवतमाळ - 3

  • कल्याण - 3

  • नवी मुंबई - 3

  • रायगड - 1

  • ठाणे - 1

  • अहमदनगर - 1

  • औरंगाबाद - 1


देशातील 16 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण

  • महाराष्ट्र- 42

  • केरळ- 25

  • उत्तर प्रदेश- 16

  • हरियाणा- 16

  • कर्नाटक- 11

  • दिल्ली- 10

  • लडाख- 8

  • तेलंगणा- 5

  • राजस्थान- 4

  • जम्मू काश्मीर- 3

  • ओदिशा- 1

  • पंजाब- 1

  • तामिळनाडू- 1

  • उत्तराखंड- 1

  • आंध्र प्रदेश- 1

  • पश्चिम बंगाल- 1


देशात आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू
कोरोनामुळे तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत काल 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही व्यक्ती कामानिमित्त दुबईला गेली होती. त्याआधी 13 मार्चला कर्नाटकातील कलबुर्गी येथे 16 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती सौदी अरेबियाहून आली होती. तर दिल्लीतील एका 68 वर्षीय महिलेचाही 17 मार्चला कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची नजर
कोरोना व्हायरसविषयी अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना शोधून काढण्यासाठी मुंबई पोलिसांची सायबर सेलची टीम कार्यरत आहे.

क्वालालंपूरमध्ये 300 भारतीय अडकले
कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये जवळपास 300 भारतीय नागरिक अडकले आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थांचा समावेश आहे. हे सर्व भारतीय फिलिपीन, कंबोडिया, मलेशिया येथून आले आहेत. सध्या हे सर्व भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत.

अमेरिकेत कोरोनामुळे 105 नागरिकांचा मृत्यू
अमेरिकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. .कोरोनामुळे आतापर्यंत 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. ऑस्ट्रेलियातही कोरोनाची 450 लोकांना लागण झाली आहे.

चीनच्या वुहानमध्ये परिस्थिती नियंत्रणात
चीनच्या वुहान शहरात या कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. या वुहान शहरात गेल्या दोन दिवसात केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 3237 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी चीनमध्ये एकूण 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. वुहान आणि हुबेई प्रांत गेल्या 23 जानेवारीपासून बंद आहेत.

संबंधित बातम्या :

Coronavirus | एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका, एकाच दिवशी दीड कोटींचं नुकसान

Coronavirus | तुमच्या घरी येणाऱ्या न्यूजपेपरवर कोरोना व्हायरस तर नाही?

Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर, हायकोर्टाकडून 15 हजारांचा दंड