बंगळुरु : भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना मुत्सद्दी राजकारणी समजलं जात. पण आज कर्नाटक निवडणुकांबद्दल बोलताना अमित शाह यांची जीभ घरसली. सिद्धरामय्या सरकारऐवजी येडियुरप्पा सरकार हे एक नंबरचं भ्रष्टाचारी सरकार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.


अमित शाह सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून पत्रकार परिषदेत ते काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत होते. शेतकऱ्यांच्या निमित्ताने त्यांनी सिद्धरामय्या सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांचा मृत्यू होत असताना सरकार झोपलं आहे, असं ते म्हणाले. मात्र सिद्धरामय्या सरकारला घेरताना त्यांच्या तोंडून आपल्याच मागील सरकारसाठी टीकेचे शब्द बाहेर पडले.

भाजपाध्यक्ष बोलत असताना त्यांच्या डाव्या बाजूला स्वत: बी एस येडियुरप्पा बसले होते. तर उजवीकडे पक्षाचे आणखी एक नेते बसले होते. यावेळी भ्रष्टाचारात सिद्धरामय्यांऐवजी येडियुरप्पांचं नाव घेतल्यानंतर, उजवीकडे बसलेल्या नेत्याने त्यांना चुकीची जाणीव करुन दिली. यानंतर आपल्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडल्याचं जाणवल्यानंतर अमित शाहांनी शब्द फिरवले.

अमित शाह यांचं हे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसनेही व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.


कर्नाटकात निवडणूक कधी?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. या निवडणुकीत 4.96 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.