Year Ender 2022 : आज (31 डिसेंबर) वर्षातील शेवटचा दिवस आहे. 2022 ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झाले आहोत. वर्ष संपताना आपण त्या वर्षात कोणत्या क्षेत्रात काय घडलं याचा आढावा घेत असतो. 2022 या वर्षात मदर डेअरीनं (Mother Dairy) पाच वेळा दूध दरात वाढ केली आहे. तर गेल्या दीड वर्षात सहा वेळा दुधाच्या दरात वाढ (Milk Prices Rises) केली आहे. तर वर्षभरात अमूल डेअरीन (Amul Dairy) चार वेळा दूध दरात वाढ केली आहे. वर्षभरात दुधाच्या दरात जवळपास 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मदर डेअरीचे दर सध्या 66 रुपये लिटर
27 डिसेंबरपासून मदर डेअरीचे दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. यासह चालू वर्षात मदर डेअरीने दुधाच्या दरात पाच वेळा वाढ केली आहे. वर्षभरात मदर डेअरीने दुधाच्या दरात 20 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळं तूप, पनीर, खवा, दही, लस्सी यांचे दरही वाढले आहेत. सध्या मदर डेअरीचा दूध दर हा 66 रुपये लिटर आहे. दुधाच्या किंमतीची आकडेवारी जर पाहिली तर 1 जुलै 2021 पूर्वी मदर डेअरीचे दूध 55 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होते. ते आता 66 रुपये प्रति लिटरने खरेदी करावे लागत आहे.
गेल्या दीड वर्षात दुधाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ
गेल्या दीड वर्षात दूध डेअऱ्यांनी वेगवेगळी कारणं देत दुधाच्या दरात अनेकवेळा वाढ केली आहे. दूध महागल्यानं खवा, पनीर, तूप, दही यांचे भाव वाढले आहेत. मिठाई दुधापासून बनवली जाते. त्यामुळं त्याचा थेट परिणाम दुधापासून बनवलेल्या वस्तूंच्या किंमतीवर होत आहे. गेल्या दीड वर्षात दुधाच्या दरात सरासरी 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. महागड्या दुधामुळं तुपाच्या दरात देखील प्रचंड वाढ झाली आहे. वर्षापूर्वी 400 ते 450 रुपये किलोने मिळणारे तूप आता 550 ते 600 रुपये किलोने मिळत आहे. गेल्या वर्षी 350 रुपये किलोने मिळणारे पनीर आता 400 ते 450 रुपये किलोने मिळत आहे. आता दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळं तूप आणि पनीरचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्याच्या दृष्टीनं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच दुधाकडे पौष्टिक आहार म्हणून पाहिले जाते. प्रत्येक घरात दुधाचे सेवन केले जाते. मात्र, दुधाच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: