मुंबई : मध्य रेल्वेच्या 'यात्री मोबाइल अॅप'मध्ये मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक आणि लाईव्ह स्टेटस यांची माहिती नव्या वर्षात अर्थात जानेवारीमध्ये प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एक्सप्रेस ट्रेन जर उशिराने धावत असेल किंवा कॅन्सल होणार असेल तर त्याची माहिती आधीच प्रवाशांना मिळणार आहे आणि त्यांच्या वेळेची बचत होणार आहे. 


आपली एक्सप्रेस ट्रेन वेळेत धावत आहे की उशिराने, की ती कॅन्सल करण्यात आली आहे हे जाणून घ्यायचा कोणताही मार्ग सध्या नाही. स्टेशन मास्तरला कॉल केल्यास उत्तर मिळेल याची खात्री नाही. त्यामुळेच प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनकडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. मध्य रेल्वेनेच तयार केलेल्या 'यात्री अॅप'मध्ये आता ही सुविधा उपलब्ध होणार आहे. 


रेल्वेगाड्यांच्या रिअल टाईम ट्रॅकिंगसह रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा यांसाठी भारतीय रेल्वे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांनी संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार रेल्वे इंजिनवर गगन तंत्रज्ञानानुसार जीपीएस लावण्यात आले आहे. त्यातून सॅटेलाइटच्या माध्यमाने रेल्वेगाडीची सद्यस्थिती मोबाईलमध्ये दिसेल. त्याचाच उपयोग करून यात्री अॅपमध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे रियल टाईम स्टेटस कळणार आहे. 


यात्री अॅपच्या या नव्या सुविधेची सध्या चाचणी सुरु असून तांत्रिक कामे बाकी आहेत. त्याच बरोबर यात्री अॅप यंत्रणा 'एनटीईएस' या यंत्रणेला देखील जोडण्यात येणार आहे. डिसेंबर अखेर ही कामे पूर्ण होतील. त्यानंतर नव्या वर्षात प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध केली जाईल. मुंबईतील जीवन ट्रेनच्या वेळापत्रकावर आधारित असतं. त्यामुळेच या नवीन फीचरचा फायदा नक्कीच प्रवाशांना होणार आहे. 


'यात्री अॅप'चे वैशिष्ट्यंं
- रेल्वे तिकीट, मासिक, त्रैमासिक पास यांचे दरपत्रक.
- विजेवर धावणारी चारचाकी बूक करण्याची सुविधा.
- पार्सल सुविधेचा तपशील.
- आपत्कालीन संपर्क क्रमांक. 
- रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधा.


मुंबईतील सर्व वाहतूक पर्यायांचा समावेश रेल्वेच्या मोबाइल अॅपमध्ये करण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा मानस आहे. सध्या यात्री अॅपवर मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्स हार्बर यांचे वेळापत्रक आहे. त्याच बरोबर लोकल कोणत्या फलाटावर येईल आणि कोणत्या दिशेला उतरायचे याची माहिती देखील दिसते. मेट्रो, मोनो आणि बोट फेरीच्या वेळा देखील यात्री अॅप मध्ये पाहता येतात. या अॅप मध्ये जर रीयल टाईम स्टेटस बघायला मिळतो तर एम इंडिकेटरसारख्या खासगी एप्सला नक्कीच यात्री अॅप तोडीस तोड ठरेल. 


महत्त्वाच्या बातम्या :