हैदराबाद : इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा संस्थापक यासिन भटकळसह चौघा जणांना हैदराबाद कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 2013 मध्ये हैदराबादमधील दिलसुखनगर स्फोटांप्रकरणी त्यांना दोषी सिद्ध करण्यात आलं आहे. भटकळला 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. इंडियन मुजाहिद्दीनच्या सदस्याला दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हैदराबाद शहरातील गजबजलेल्या दिलसुखनगरच्या बसस्टॉपजवळ तसंच कोणार्क थिएटरच्या समोर गुरुवार 21 फेब्रुवारी 2013 च्या संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन शक्तीशाली स्फोट झाले होते. दोन्ही स्फोटांमध्ये पाच मिनिटांचं अंतर होतं. या स्फोटांमध्ये 16 जणांना प्राण गमवावे लागले होते, तर 119 जण जखमी झाले होते.
या स्फोटांमध्ये आयईडीचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. कर्नाटकातील उडपीचा रहिवासी असलेला भटकळ हा अहमदाबाद, सुरत, बंगळुरु, पुणे, दिल्ली, हैदराबादमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी वाँटेड होता. 2007 मधील वाराणसी, फैजाबाद, लखनऊ स्फोट, 11 जुलै 2006 चा वाराणसी स्फोट, 11 जुलै 2006 चे मुंबईतील लोकलमधले साखळी स्फोट आणि 25 ऑगस्ट 2007 रोजी हैदराबादमध्ये झालेले दुहेरी स्फोट यात यासिनचा सहभाग असल्याचं 'एनआयए'ने म्हटलं होतं.