मुंबई : 'यास' हे चक्रीवादळ ओडिशामध्ये धडकत असल्यामुळं येथील बऱ्याच भागामध्ये सोसाट्याचे वारे आणि अतीमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशातील भद्रक जिल्ह्यात वादळचाचे थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. भारतीय हवामान खात्याचे मुख्य संचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी दिलेल्या माहिनुसार मंगळवारीच सायंकाळी या चक्रीवादळानं भीषण स्वरुप धारण केलं. चक्रीवादळ पोहोचण्याच्या सहा तास आधी आणि नंतर या भागामध्ये त्याचे गंभीर स्वरुपाचे परिणाम दिसून येतील अशीही माहिती त्यांनी दिली होती. 


चक्रीवादळ किनाऱपट्टी भागात पोहोचण्यापूर्वीच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली. किनारपट्टी भागातून जवळपास 50 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. यास चक्रीवादळ पारादीपपासून 140 किमी अंतरावर, तर बालासोरपासून 220 किमी अंतरावर. परिणामी इथं 150 किमी प्रतितास इतक्या वेगाहून जास्त सोसाट्याचे वारेही मोठं नुकसान करण्याची शक्यता असल्याचं म्हणत नागरिकांना सावध करण्यात आलं आहे. 


P-305 तराफ्यावरील बचावकार्याचा थरारक व्हिडीओ, खवळलेल्या समुद्रात नौदलाचा लाटांशी सामना


मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात सक्रिय असणारं यास हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत ते अतितीव्र श्रेणीपर्यंत (वाऱ्यांचा वेग अंदाजे ताशी 165 किमी) पोहोचलं असून. दुपारच्या सुमारास ते ओडिशातील बालासोरजवळ किनारपट्टी ओलांडेल असंही आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे. 






चक्रीवादळाचे परिणाम फक्त ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येच नव्हे, तर इतरही राज्यांमध्ये दिसून येऊ शकतात. आसाम, मेघालय, झारखंड, बिहार या राज्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, पश्चिम बंगाल, ओडिशा किनारपट्टीवर दोन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवत सतर्कतेचा इशारा देत प्रशासन आणि बचाव पथकांना तत्पर राहण्याचा इशारा दिला आहे.