Wrestlers' Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आज (28 मे) नव्या संसद भवनाच्या इमारतीचं (New Parliament House)  उद्घाटन करणार आहे. दरम्यान, जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या समर्थनार्थ आज नव्या संसद भवनाबाहेर खाप पंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी नेते या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. आंदोलन करणारे कुस्तीपटू भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेची मागणी करत आहेत. दुसरीकडे, शनिवारी (27 मे) रात्री उशिरा कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेऊन महापंचायत होऊ नये यासाठी शासन आमच्यावर दबाव आणत असल्याचं सांगितलं. मात्र, आपण मागे हटणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आम्ही त्यांच्या दबावाखाली येणार नाही, असंही कुस्तीपटू यावेळी म्हणाले.


लोकांनी महिला सन्मान महापंचायतीत सामील व्हावे : विनेश फोगट


यावेळी कुस्तीपटू विनेश फोगट बोलताना म्हणाली की, महिला सन्मान महापंचायत रविवारी होणारच आहे. संपूर्ण दिल्लीत पोलिसांनी गस्त घातली आहे, पण आम्ही सर्वांना महिला सन्मान महापंचायतीत सहभागी होण्याचं आवाहन करतो. 




मी नार्को चाचणीसाठी तयार : बृजभूषण शरण सिंह


आरोपांच्या भोवऱ्यात डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटूंचं आव्हान स्विकारत नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं सांगितलं. पण त्यांनी एक अट ठेवली होती. त्याबाबत बोलताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, "जर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया त्यांची टेस्ट करण्यास तयार असतील, तर पत्रकारांना बोलावून त्यासंदर्भात घोषणा करा. मी त्यांना वचन देतो की, मीही यासाठी तयार आहे." तसेच, पुढे बोलताना त्यांनी ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. "मी यापूर्वीही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि यापुढेही या वक्तव्यावर ठाम राहीन हे मी माझ्या देशवासियांना वचन देतो." दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करुन यासंदर्भात मागणी केली. 


जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन 


कुस्तीपटू गेल्या 28 दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.