नवी दिल्ली:  राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतरवर खेळाडूंचं आंदोलन (Wrestler Protest) आठ दिवसानंतरही कायम आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टानं सांगितल्यावर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी केस दाखल केली. पण यात राजकीय, प्रादेशिक वादांचीही किनार उभी करण्याचा प्रयत्न होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर तर दाखल केली...पण अद्यापही बृजभूषण काही हेका सोडायला तयार नाही. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन आपण राजीनामा देणार नाही असंच ते अजूनही म्हणतायत. या आंदोलनात राजकारण असल्याचाही दावा ते करत आहेत.न


 गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीतल्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन   सुरु आहे. आंदोलकांनी दिल्ली पोलिसांकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. पण पाच दिवस दिल्ली पोलिस त्यावर काही हालचाल करत नव्हते. अखेर सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर ही तक्रार दाखल करुन घेतली. आता जोपर्यंत बृजभूषण यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत माघार नाही असा आंदोलकांनी पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे या सगळ्या वादाला हरियाणा विरुद्ध यूपी..जाट विरुद्ध ठाकूर अशा वादाचाही किनार मिळताना दिसत आहे. दोन्ही बाजूंच्या संघटनाकडून त्यानुसारच भूमिका घेतल्या जात आहेत. 


सध्या जंतरमंतरवर जे आंदोलनाला बसलेत ते बहुतांश खेळाडू हरियाणाचे आहेत. अर्थात कुस्तीमध्ये हरियाणाचं वर्चस्व आहे. हरियाणात कुस्ती फेडरेशन सुरु करायला आपण परवानगी दिली नाही. त्यामुळे तिथल्या एका बड्या उद्योजकानं काहींना हाताशी धरुन हे षडयंत्र आखल्याचा बृजभूषण सिंह यांचा दावा आहे. नव्या धोरणांमध्ये हरियाणाच्या एकहाती वर्चस्वाला जागा मिळत नव्हती त्यामुळे प्रादेशिक वादाचीही किनार याला असल्याचं बोललं जात आहे. 


 बृजभूषण सिंह हे यूपीतल्या गोंडामधून भाजपचे खासदार आहेत. आसपासच्या पाच सहा लोकसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. बाबरी मशीद प्रकरणातले प्रमुख आरोपी ते स्थानिक लेवलला 55 इंटर कॉलेजेसचं जाळं असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्यावर कारवाई करताना यूपीतल्या या सगळ्या व्होट बँकेचाही विचार होतोय का अशीही चर्चा सुरु आहे. माझ्यावरचे आरोप हे कुस्ती महासंघाचा अध्यक्ष म्हणून आहेत. पक्षाशी त्याचा काही संबंध नाही असाही बचाव ते करत आहेत 


 या सगळ्या आंदोलनापाठीमागे काँग्रेसचे हरियाणातले नेते दीपेंदर हुड्डा असल्याचा दावा बृजभूषण करत आहेत. हरियाणातल्या एका उद्योगपतीनंही आपली ताकद यांच्यापाठीमागे लावल्याचा त्यांचा आरोप आहे. पण केवळ असा प्रादेशिक, राजकीय रंग देऊन बृजभूषण स्वत:ला निर्दोष सिद्ध करु शकणार का हा प्रश्न आहे. खेळाडू राजीनाम्यावर ठाम आहेत, तर बृजभूषण आपल्या न देण्याच्या पवित्र्यावर...आता या कुस्तीत कोण कुणाला धोबीपछाड देतं हे लवकरच कळेल.