श्रीनगर : आज जगभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. ईदनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. काश्मीरमध्येही ईद साजरी केली जात आहे. दरम्यान ईदनिमित्त सकाळच्या नमाज पठणानंतर काश्मीर प्रातांत विविध रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान काश्मीरमधल्या अनेक तरुणांनी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि इसिस या दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवले आहेत. यादरम्यान सुरक्षाबल आणि दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवणाऱ्या तरुणांमध्ये झटापटदेखील झाली.


श्रीनगरमधील जामा मशीदीजवळ जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आणि काही दिवासांपूर्वी ज्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातले त्या दहशतवादी जाकीर मुसा या दोघांची छायाचित्र लावण्यात आली होती.


दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पुलवामा परिसरात दहशतवाद्यांनी रमजान ईदच्या एक दिवस आधी एका महिलेची तिच्या घरात घुसून हत्या केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुलवामा जिल्ह्याच्या सिंगू-नरबालमध्ये दहशतवाद्यांनी एका महिलेवर आणि एका तरुणावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात स्थानिक महिला नगीना बानो हीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच एक तरुण जबर जखमी झाला आहे. त्या तरुणावर सध्या उपचार सुरु आहेत.