चेन्नई: हेडफोन लावून गाणी ऐकत डुलकी देण्याची अनेकांना सवय आहे. मात्र हीच सवय तामिळनाडूतील एका महिलेच्या जीवावर बेतली.


तामिळनाडूची राजधानी चेन्नईत 46 वर्षीय एक महिला हेडफोन लावून झोपली होती. त्याचवेळी शॉर्ट सर्किट होऊन, शॉक लागून तिचा मृत्यू झाला.

फातिमा असं या महिलेचं नाव आहे. रविवारी ही धक्कादायक घटना घडली.

फातिमा चेन्नईतील कंथूर इथल्या रहिवासी होत्या. त्या हेडफोन्स लावून झोपल्या होत्या. बऱ्याच वेळ त्या झोपून राहिल्याने, त्यांच्या पतीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या उठल्या नाहीत.

पत्नी उठत नसल्याचं पाहून त्यांनी भीतीने आरडाओरडा केला, त्यानंतर तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

रुग्णालयानेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शॉर्ट सर्किटमुळे शॉक

दरम्यान, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. डॉक्टरांच्या अहवालानुसार फातिमा यांचा मृत्यू शॉक लागल्याने झाला.

“महिला शनिवारी रात्री हेडफोन लावून झोपली होती. त्यामुळे प्राथमिक चौकशीत, त्यांचा मृत्यू शॉर्ट सर्किटमुळे करंट लागून झाल्याचा अंदाज आहे” असं डॉक्टरांनी सांगितलं.