नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोहल्यावर कधी चढणार? हा विषय राष्ट्रीय प्रश्न असल्याप्रमाणे चघळला जातो. लग्नाबाबत फक्त राहुल यांनाच छेडलं जातं, असं नाही. रायबरेलीच्या काँग्रेस आमदारालाही राहुल गांधींशी लग्न करणार का? हा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे संतापून आमदार अदिती सिंग यांनी मौन सोडलं आहे.

राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं आमदार अदिती सिंग यांनी खंडन केलं आहे. 'तथ्यहीन अफवा ऐकून मी खरंच नाराज आहे. राहुलजी माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. मी त्यांना सन्मानाने राखी बांधते. आमच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या वावड्या उठवणारे चुकीचे आहेत. माझी आणि राहुल गांधीजी यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा डाव आहे' असं अदिती सांगतात.

'कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाचं लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. या अफवांमागे कोण असू शकतं, हे तुम्ही ओळखू शकता' असं सांगत अदिती सिंग यांनी विरोधकांकडे अंगुलीनिर्देश केला.

राहुल गांधी, अदिती आणि त्यांच्या कुटुंबाचा एकत्रित फोटो शनिवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'राहुल गांधींना अखेर सुयोग्य जोडीदार मिळाला. सोनिया गांधी पुढील बोलणी करत आहेत' अशा आशयाचं कॅप्शन फोटोला जोडण्यात आलं होतं. त्यानंतर अदिती यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. 'अफवा पसरवणाऱ्यांनी सावध राहा' असा इशारा त्यांनी दिला.


गांधी कुटुंबीय आणि अदितीच्या कुटुंबाची गेल्या अनेक दशकांपासून ओळख आहे. त्यापैकी एका भेटीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अदिती या गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत रायबरेलीतील सदर मतदारसंघातून विजयी झाल्या. यापूर्वी त्यांचे वडील अखिलेश सिंग याच मतदारसंघातून आमदार होते.

29 वर्षीय अदिती सिंग यांनी अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटीतून मॅनेजमेंट विषयात पदवी मिळवली आहे. अदिती या प्रियंका गांधी वड्रा यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांच्याकडून प्रेरणा घेतच अदिती यांनी राजकारणात प्रवेश घेतला.