मुंबई: सध्या बँकेतून आणि एटीएममधून नोटा काढण्यासाठी असलेली मर्यादा यापुढेही सुरू ठेवावी अशी शिफारस देशभरातील बँकांनी अर्थ मंत्रालयाला केली आहे. जोपर्यंत रिझर्व बँक बँकांना पुरेशी रोकड पुरवत नाही, तोपर्यंत हे निर्बंध कायम ठेवावेत अशी शिफारसही बँकांनी केली आहे.
"नोटबंदीनंतर पहिले 50 दिवस ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध असतील, त्यानंतर परिस्थिती सुधारेल" असं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी वारंवार सांगितलं होतं. आजच नोटाबंदीला 50 दिवस पूर्ण होत आहेत. तर रद्द करण्यात आलेल्या हजार-पाचशेच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी आहे. त्यानंतर केंद्र सरकार बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा शिथील करण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने बँकांशी चर्चा न करता असा निर्णय घेऊ नये, असंही बँकांनी सुचवलं आहे.
30 डिसेंबरनंतर बँका तसंच एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा शिथील केली तर लोक मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यासाठी बँकात गर्दी करतील आणि त्यामुळे बँकाचं दैनंदिन व्यवस्थापन कोलमडून पडेल अशी भितीही व्यक्त करण्यात आली आहे.
30 डिसेंबरनंतर बँका आणि एटीएममधून पैसे काढण्याचे निर्बंध शिथील करण्याविषयी सर्व बँकाचं काय मत आहे, याविषयी केंद्र सरकारने अभिप्राय मागवला होता. त्यावर बँकांनी एवढ्यात ही मर्यादा शिथील करू नये असं स्पष्ट केलं आहे.
सर्व बँकाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या इंडियन बँक्स असोसिएशन या संघटनेने ही शिफारस सरकारला केली असली, तरी आयबीए म्हणजेच इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे चेअरमन आणि एमडी राजीव ऋषी यांनी मात्र आयबीएने सरकारला अशी कोणतीही शिफारस अधिकृतपणे केली नसल्याचं स्पष्ट केलं.
बँकेतून पैसे काढण्यावर सध्या असलेल्या निर्बंध शिथील करायचे की कायम ठेवायचे याचा निर्णय केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेनेच घ्यायचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सध्याची मर्यादा
सध्या बँकेतून आठवड्याला रू. 24 हजार आणि एटीएममधून दररोज रू. 2500 अशी मर्यादा आहे.
नोटाबंदीनंतर म्हणजे 9 नोव्हेंबरपासून ते 19 डिसेंबरपर्यंत रिझर्व बँकेने सिस्टीममध्ये 5.92 लाख कोटी रूपये टाकले आहेत. रद्द करण्यात आलेल्या नोटांच्या म्हणजे 15.44 लाख कोटी रूपयांच्या प्रमाणात ही रिझर्व बँकेने सिस्टीममध्ये टाकलेली रक्कम ही फक्त 38.3 टक्के आहे. मधल्या काळात सरकारने रोकड विरहित व्यवहारासाठी अनेक उपाययोजना अवलंबल्या आहेत.
बँकाच्या मते सध्या पाचशे रूपयांच्या नव्या नोटांचा तुटवडा आणि बँक ग्राहकांचं नव्या नोटा बँकेत जमा न करता स्वतःकडे साठवून ठेवणं हे प्रमुख प्रश्न आहेत. पैसे काढण्यावर सध्या असलेल्या निर्बंधामुळे अनेक व्यापारी त्यांच्याकडे येणारी वैध रोकड बँकेत जमा करत नाहीत. त्यामुळेच सध्या असलेली मर्यादा कायम ठेवावी असं बँकांना वाटतं.