मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अवघ्या काही तासात मायदेशी परतणार आहेत. अभिनंदन यांच्या परतीची वेळ अद्याप निश्चित झालेली नसली, तरी बीटिंग द रिट्रीटच्या वेळी त्यांना भारताकडे सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.


अभिनंदन यांना दुपारपर्यंत आणले जावे, अशी भारताची मागणी आहे. पाकिस्तानने मात्र बीटिंग द रिट्रीटच्या वेळी अभिनंदन यांना सुपूर्द करणार असल्याचं सांगितलं आहे.

भारताच्या दबावापुढे झुकलेल्या पाकिस्तानने आपल्या ताब्यातील भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची तयारी दर्शवली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यांची घोषणा केली.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र

अभिनंदन सध्या इस्लामाबादमध्ये असून त्यांना शुक्रवारी दुपारी विमानाने लाहोरला आणण्यात येईल. त्यानंतर वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारताकडे सुपूर्द केले जाईल. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात येईल. तिथून ते राजधानी दिल्लीला रवाना होतील.

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी (27 फेब्रुवारी) हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईत भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा

 अभिनंदन वर्धमान अपघातग्रस्त विमानातून पॅराशूटने बाहेर पडले. मात्र पाकव्याप्त काश्मिरमधील भिंबर जिल्ह्यातील एका गावात उतरले. त्यांनी ही कुठली जागा असल्याची विचारणा केली असता, एका नागरिकाने हा भारत असल्याची खोटी माहिती दिली.


 VIDEO | असे सापडले विंग कमांडर अभिनंदन पाकच्या ताब्यात



स्थानिकांच्या वेशभूषेवरुन अभिनंदन यांना संशय आला आणि त्याने 'जय माता दी' अशी घोषणा दिली. मात्र त्याला जयघोषात उत्तर न आल्यामुळे आपण पाकिस्तानात असल्याची अभिनंदन यांची खात्री पटली. त्याक्षणी त्यांनी उपस्थितांच्या दिशेने पिस्तूल रोखली.

अभिनंदन यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने त्यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. जखमी असल्यामुळे ते अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त पळू शकले नाहीत.
गोष्ट नचिकेताची.. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतलेला वैमानिक

शत्रू पाकिस्तानींच्या घेरावात असतानाही अभिनंदन डगमगले नाहीत. संतप्त जमावाच्या हाती लागण्याआधीच त्यांनी स्वतःकडे असलेली महत्त्वाची कागदपत्रं आणि नकाशे खाऊन टाकले, तर काही पाण्यात भिजवले.

पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याकडून गुपित उकळण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी आपलं नाव आणि बॅच नंबर याशिवाय कोणतीही माहिती दिली नाही.

''शांतीचा संदेश देताना आम्ही भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका करु" अशी घोषणा इम्रान खान यांनी केल्यानंतर सभागृहात उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून प्रस्तावाचं स्वागत केलं होतं.