नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सहभागावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. याचदरम्यान आपल्याला जे काही बोलायचं, ते नागपुरातच बोलू, अशी प्रतिक्रिया प्रणव मुखर्जींनी दिली आहे.

एबीपी समुहाचं बंगाली वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रणव मुखर्जींनी आपलं मत मांडलं. याबाबत आपल्याला अनेक प्रकारचे पत्र आणि फोन कॉल आले, मात्र मी कुणालाही उत्तर दिलं नाही, असंही प्रणव मुखर्जींनी सांगितलं.

काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, ज्यामध्ये जयराम रमेश, सी के जाफर शरीफ, रमेश चेन्निथला यांनी प्रणव मुखर्जींना कार्यक्रमाला न जाण्याबाबत सल्ला दिला आहे.

नागपुरात आरएसएसच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 7 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.