लखनौ : देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली विधानसभा निवडणुका आहेत आणि सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीने तयारीलाही लागले आहेत. काँग्रेस पक्षही उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी तयारीला लागला असून, गेल्या काही वर्षांपासून पक्षाची होत असलेली पिछेहाट रोखण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे.

 

काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्याबाबत अत्यंत गंभीरपणे विचार करत असून, त्यानुसारच रणनिती आखली जात आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी याच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारही असतील, असं बोलले जात आहे. शिवाय, राहुल गांधी यांच्या नावाचाही विचार केला जात आहे.

 

काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, 19 मेनंतर याबाबत अधिकृत घोषणा कांग्रेसकडून केली जाणार आहे. 19 मे रोजी पाच राज्यांमधील निवडणुकांची मतमोजणी आहे.

 

जर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषित झाल्यास, निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त होणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या नाहीत. मात्र, काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, जर प्रियंका गांधी किंवा राहुल गांधी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदावारीसाठी तयार झाले नाहीत, तर कुणा ब्राम्हण उमेदवारालाच या पदासाठी समोर केले जाईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये महत्त्वाचे बदलही केले जाणार आहेत.