मुंबई : देशभरात आज राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेचा (नीट) पहिला टप्पा पार पडत आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारची याचिका फेटाळल्यानंतर सुनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच नीट परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात देशभरात जवळपास साडे सहा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसल्याची माहिती आहे.

 
नीट परीक्षा आणि राज्यांच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्यामुळे तयारी करणं कठीण जात असल्याचं काही विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र विद्यार्थ्यांची ही याचिकाही कोर्टाने फेटाळली.

 
नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असताना मुख्यमंत्रीही त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ‘नीटच्या परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक आहे. नीटविरोधातील अनेक राज्य आमच्या भूमिकेशी सहमत आहेत. आम्ही 8 राज्यं मिळून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात लढणार आहोत. नीटची परीक्षा 2018 पासूनच लागू करा’ अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती.

 
याबाबत पुढील सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार असून राज्य सरकार आपापली भूमिका मांडणार आहे. दरम्यान परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होत असून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 24 जुलै रोजी होणार आहे.


संबंधित बातम्या :


त्यापेक्षा अभ्यास करा, 'नीट'बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली


‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश


सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?