लखनौ : जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकाव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात 'जैश..'चे 350 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. परंतु सरकारने अद्याप याचे पुरावे सादर केलेले नाहीत. विरोधी पक्षाने याबाबतच्या पुराव्यांची मागणी केली आहे. त्यातच आता पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या वीरपत्नीनेदेखील बालाकोट येथील हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले आहेत.

पुलवामात येथे झालेल्या हल्ल्यात सीआपीएफच्या 176 बटालियनमधले जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देवी यांनी सरकारकडे 'एअर स्ट्राईक'चे पुरावे मागितले आहेत. गीता देवी म्हणाल्या की, "माझ्या पतीचे शव मी पाहिले आहे. भारताने खरोखरच 'जैश..'च्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला असेल, तर सरकारने त्याचे पुरावे सादर करायला हवेत."



काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी केली होती. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, "काही वर्षांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असलेल्या ओसामा बिन लादेनवर कारवाई केली. त्याचा अड्डा उध्वस्त करुन त्याला ठार केले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेने लादेनला ठार केल्याचे पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे."

वाचा : राफेल कराराशी निगडित कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला : महाधिवक्ता

14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेतील एका दहशतवाद्याने 350 किलो स्फोटकांनी भरलेली गाडी भारतीय जवानांच्या ताफ्यातील एका बसवर आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात 40 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करुन पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून जैशच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाल्याचा दावा सरकारने केला आहे.