बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगळुरुत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्यावर हल्लाबोल केला. 15 मिनिटं मातृभाषेत बोलण्याच्या पंतप्रधानांच्या आव्हानावरही राहुल गांधींनी उत्तर दिलं.

'माझ्या आईने मोठा त्याग केला'
राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं बोलावं, वाटल्यास मातृभाषेत बोलावं, पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीवरही काँग्रेस अध्यक्षांनी उत्तर दिलं. "माझी आई इटालियन आहे. पण तिने आयुष्यातील मोठा काळ भारतात घालवला आहे. अनेक भारतीयांपेक्षा ती जास्त भारतीय आहे. माझ्या आईने देशासाठी मोठा त्याग केला आहे आणि खूप काही सहन केलं आहे. जर पंतप्रधानांना माझ्यावर अशी टिप्पणी करुन आनंद मिळतो, तर त्यांनी करत राहावं."

निवडणूक कर्नाटकची, मी पंतप्रधान बनण्याची नाही!
"ही निवडणूक कर्नाटकची आहे. मी पंतप्रधान बनण्याची किंवा माझ्या भविष्याची नाही," असंही राहुल गांधी म्हणाले.

2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष ठरला तर मी पंतप्रधान का बनू नये, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर 9 मेच्या बंगारपेटच्या सभेत मोदी बोलले होते की, "टँकरमधील पाण्यासाठी लोक रांगेत बादल्या ठेवतात. पण दबंग व्यक्ती लोकशाही मानत नाही. तो छाती फुगवून आपली बादली पहिली ठेवतो. काल असंच झालं. नामदाराने रांगेत आपली बादली पहिली ठेवली."

मोदींवर थेट हल्ला
मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, "पंतप्रधान कर्नाटकमधील जनतेच्या मुद्द्यांवर बोलत नाहीत, तर त्यांची दिशाभूल करत आहेत. ते बुलेट ट्रेन, सी प्लेनच्या गोष्टी करतात. तर शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षा, शेतीसाठी पाणी यांसारख्या सामान्यांच्या मुद्द्यांवर मौन बाळगतात."

पत्रकार परिषदेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याही उपस्थित होते. यादरम्यान राहुल गांधींनी कर्नाटकच्या जनतेकडून फार काही शिकल्याचं म्हटलं. "कर्नाटकात फिरुन आम्ही जनतेचं मत जाणून घेतलं आणि त्यांचा आवाज घोषणापत्रात सामील केला. भाजपने आपल्या घोषणापत्राची कॉपी केली आहे," असा दावा त्यांनी केला.

"प्रतिस्पर्ध्यांनी आमच्यावर खासगी टीका-टिप्पणी केली. तर आम्ही मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत. राज्यात आमचाच विजय होईल," असा विश्वासही काँग्रेस अध्यक्षांनी व्यक्त केला.

संपूर्ण पत्रकार परिषद



पाच मिनिटं बोला, राहुल गांधींचं मोदींना नवं आव्हान

राहुल गांधींनी कोणत्याही भाषेत, अगदी मातृभाषेत 15 मिनिटं बोलावं : मोदी

संसदेत 15 मिनिटं द्या, मोदी उभे राहणार नाहीत : राहुल गांधी