नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या तिहारभेटीनं आज अनेकांच्या भुवया उंचावल्या. INX Media घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण करण्यासाठीची ही भेट होती. काँग्रेस चिदंबरम यांच्या पाठीशी उभी असल्याचा संदेश या भेटीतून देण्याचा हा प्रयत्न होता.

आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात अडकलेल्या चिदंबरम यांना भेटण्यासाठी आज तिहार जेलमध्ये विशेष पाहुणे आले होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे दोघे चिदंबरम यांच्या भेटीसाठी आले होते. चिदंबरम यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे, हे दाखवण्यासाठीच ही भेट आखण्यात आली होती. सकाळी नऊ ते 10 च्या दरम्यान या दोघांनी जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर चिदंबरम यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

चिदंबरम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, श्रीमती सोनिया गांधी आणि डाँ. मनमोहन सिंह आज मला भेटण्यासाठी आले होते, हा मी माझा सन्मान समजतो. काँग्रेस पक्ष मजबूत आणि निडर आहे तोवर मीही मजबूत आणि निडरच राहीन.


गेल्या महिनाभरापासून चिदंबरम यांची जेलवारी सुरु आहे. या प्रकरणात काहीही तथ्य नसून हा केवळ राजकीय सूड उगवण्याचा प्रकार आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे.

21 आँगस्टपासून चिदंबरम हे सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीतल्या मुक्कामाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. शिवाय इतक्यात त्यांची सुटका होणार नाही. कारण नुकतंच दिल्लीतल्या न्यायालयाने चिदंबरम यांची कोठडी 3 आँक्टोबरपर्यंत वाढवली आहे. चिदंबरम सध्या एकटे नसल्याचा संदेश या सोनिया, मनमोहन या आपल्या भेटीद्वारे दिला.

सीबीआय, ईडीच्या रडारवर सध्या अनेक राजकीय प्रकरणं आहेत. चिदंबरम जेलमध्ये गेले, कर्नाटकचे डी. के. शिवकुमार यांनाही ईडीनं उचललं, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीदेखील ईडीच्या रडारवर आहे. अशी एकापाठोपाठ एक संकटं येत असताना काँग्रेसनं जाहीरपणे चिदंबरम यांची पाठराखण करुन आपण ही संकटं झेलायला तयार असल्याचं दाखवून दिलं आहे. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातला काय फरक आहे याची झलकही आज त्यानिमित्तानं पाहायला मिळाली.