मुंबई: बालाकोट, सर्जिकल स्ट्राईकचा वापर सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी करतात हा आरोप होत असतानाच आता थेट लष्करप्रमुखांनाच या वादात ओढण्यात आलंय. पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये ५०० दहशतवादी काश्मिरात घुसण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नुकतंच केलं. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी रावत यांच्या 'टायमिंग'वर बोट ठेवलंय. लष्करप्रमुखांना नेमकं महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणुका जाहीर झाल्यावरच 'बालाकोट'ची आठवण कशी येते? असा सवाल मेमन यांनी विचारलाय.
"बालाकोट हल्ल्याला आता काही महिने होऊन गेलेत. मग, नेमकं महाराष्ट्र व हरियाणात निवडणुका जाहीर झाल्यावर रावत यांना बालाकोटची आठवण कशी काय येते? लष्करप्रमुखांनी सरकारच्या प्रचार यंत्रणेचा हिस्सा बनू नये. हे त्यांच्यासाठी चांगलं नाही. आम्ही पाहतोय की पुलवामा आणि बालाकोटसारख्या गोष्टी समोर येतायत. मात्र, त्यांचा आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही", असं मेमन म्हणाले.
मेमन यांनी असंही म्हटलं की, ८० रू. लिटर झालेलं पेट्रोल, बेरोजगारी, अर्थव्यवस्थआ हे मुद्दे विधानसभा निवडणुकांशी जोडलेले आहेत. या मुद्यांवर महाराष्ट्र आणि हरियाणातील लोक मतदान करतील. निवडणूक प्रचार सुरू झालाय आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, रावत यांना पुलवामास बालाकोटची आठवण येतेय.
मेमन यांच्या या वक्तव्यावर जोरदार वादंग सुरू झाला असून समाजमाध्यमांवर त्यांच्यावर टीकाही सुरू झालीये. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही, पुलवामासारखा प्रकार घडला नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर होईल, असा दावा केला होता.
काय म्हणाले होते लष्करप्रमुख बिपीन रावत?
भारतानं पाकिस्तानतल्या बालाकोटमध्ये घुसून 'सर्जिकल स्ट्राईक' केल्यानंतरही पाकिस्तान सुधारलेला नाही. कारण, बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा तळ सुरू झाला असून जवळपास ५०० जण काश्मिरात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली आहे. चेन्नईतल्या 'ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी'मध्ये 'यंग लिडर्स ट्रेनिंग विंग'च्या उद्घाटनावेळी त्यांनी ही माहिती दिली.
या वर्षीच्या फेब्रुवारीतच भारतीय वायूसेनेनं बालाकोटमध्ये कारवाई करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. मात्र, "आता बर्फ वितळणं सुरू झाल्यामुळे उत्तरकडून घुसखोरीची शक्यता आहे, पण आम्ही पश्चिम सीमेवर सैन्याच्या अधिक तुकड्या पाठवल्या आहेत", असंही रावत यांनी स्पष्ट केलं.
"आम्ही गरज पडल्यास बालाकोटच्याही पुढे जाऊन हल्ला करू शकतो, पण त्याबद्दल पाकिस्तानलाच अंदाज लावत बसू दे", असंही रावत यांनी म्हटलं. नुकतंच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मिरात जिहाद करायला कुणीही सीमेवर जाऊ नये, असं त्यांच्या देशातल्या कट्टरतावादी गटांना म्हटलं होतं. मात्र, पाकिस्तानी लष्कर आणि पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआय यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या या जिहादी-दहशतवादी गटांनी इम्रान खान यांना महत्व दिलं नसल्याचं दिसत आहे.
निवडणुकांच्या वेळीच 'बालाकोट' कसं आठवतं?, राष्ट्रवादीच्या माजिद मेमन यांचा लष्करप्रमुखांना सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2019 03:45 PM (IST)
महाराष्ट्र, हरियाणाच्या निवडणुका जाहीर होताच लष्करप्रमुखांना बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक कसं आठवतं? लष्करप्रमुखांनी सरकारच्या प्रचार यंत्रणेचा भाग बनू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन यांनी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्यावर टीका केली आहे. रावत यांनी नुकतंच, पाकिस्तानात ५०० अतिरेकी काश्मिरात घुसण्याच्या तयारीत आहेत, मात्र भारतही बालाकोटच्या पलिकडे जाऊन उत्तर देऊ शकतो, असं म्हटलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -