नवी दिल्ली : शाळेची फी भरली नाही म्हणून केजीच्या विद्यार्थिनींना कोंडून ठेवल्याचा प्रकार सोमवारी दिल्लीच्या चांदनी चौक येथील शाळेत घडला आहे. राबिया गर्ल्स पब्लिक स्कूल शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. शाळेची फी थकलेल्या 16 विद्यार्थिनींना सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत कोंडून ठेवण्यात आलं होतं. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलींना घरी नेण्यासाठी शाळेत पोहोचले, मात्र मुली कुठेही दिसल्या नाहीत. त्यावेळी चौकशी केल्यानंतर या सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या बेसमेंटमध्ये बंद करुन ठेवल्याचं पालकांना समजलं. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत मोठा गोंधळ घातला. सोमवारी हा सगळा प्रकार घडला. विद्यार्थिनींना कोंडून ठेवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांनी दिले कारवाईचे आदेश शाळा प्रशासनाच्या गैरवर्तनाची माहिती मिळताच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'विद्यार्थ्यांना कोंडून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर मला धक्का बसला. प्रकरणाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांना शाळेविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.' 'द हिंदू'मधील बातमीनुसार, शाळेच्या एका शिक्षकाने सांगितलं की, 'शाळेची फी 30 तारखेला जमा करावी लागते. फी न भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेत बसून दिलं जात नाही.' शाळा प्रत्येक विद्यार्थ्याकडून दर महिन्याला तीन हजार रुपये फी आकारते. शाळेविरोधात गुन्हा दाखल विद्यार्थ्यांना कोंडून ठेवल्याप्रकरणी पालकांनी शाळेविरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. जवळपास पाच तास चिमुकल्यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. याप्रकरणी कमला मार्केटमधील पोलिस उपायुक्त म्हणाले की, 'आयपीसी कलम 342नुसार शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनातील दोषींना लवकरच अटक करण्यात येईल.'