नवी दिल्ली : या वर्षी भारत आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक क्रांतिकारी फासावर चढले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वात मोठी भूमिका बजावली ती राष्ट्रपिता महात्मा गांधींनी. पण ज्यावेळी पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला जात होता त्यावेळी मात्र गांधीजी उपस्थित नव्हते. मग ते नेमके कुठे होते? महात्मा गांधी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी दिल्लीमध्ये उपस्थित का नव्हते? याची माहिती आपण घेऊयात.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन मोठे नेते म्हणजे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू. स्वातंत्र्याच्या वेळी जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र पाठवून त्यांना स्वातंत्र्यदिनी आशीर्वाद देण्याची विनंती केली होती. पण महात्मा गांधींनी पत्राला उत्तर देताना आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही असं सांगितलं होतं.
महात्मा गांधींचे पत्र
नेहरू आणि पटेल यांच्या पत्राला उत्तर देताना महात्मा गांधी म्हणाले होते की, देशात जातीय दंगली होत असताना अशा परिस्थितीत आपण स्वातंत्र्य उत्सवात कसे सहभागी होऊ शकतो? 14-15 ऑगस्ट 1947 च्या रात्री जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारतातील पहिले भाषण देत होते, तेव्हा फार कमी लोकांना माहित होते की महात्मा गांधींनी कोणत्याही कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. कारण भारत-पाकिस्तान फाळणीच्या शोकांतिकेने त्यांना हादरवून सोडलं होतं.
त्यावेळी महात्मा गांधींनी आपल्या पत्रात म्हटलं होतं की, 15 ऑगस्टला मी आनंदी होऊ शकत नाही. मी तुम्हाला फसवू इच्छित नाही, परंतु त्याच वेळी मी असे म्हणणार नाही की तुम्ही देखील उत्सव साजरा करू नका. दुर्दैवाने आज आपल्याला ज्या प्रकारे स्वातंत्र्य मिळाले आहे त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भविष्यातील संघर्षाची बीजेही आहेत. अशा स्थितीत आपण स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी दिवे कसे लावणार? माझ्यासाठी स्वातंत्र्याच्या घोषणेपेक्षा हिंदू आणि मुस्लिमांमधील शांतता महत्त्वाची आहे.
स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधी कुठे होते?
आता प्रश्न असा आहे की स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधी कुठे होते. सरकारी कागदपत्रांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, स्वातंत्र्याच्या वेळी गांधीजी बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोलकात्यात गेले होते. बंगालमध्ये हिंदू-मुस्लिम यांच्यात वर्षभराहून अधिक काळ संघर्ष सुरू होता. महात्मा गांधी नौखाली (जे आता बांगलादेशात आहे) येथे जाण्यासाठी 9 ऑगस्ट 1947 रोजी कलकत्त्याला पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी मुस्लिम वसाहतीतील हैदरी मंझिलमध्ये मुक्काम केला आणि बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि रक्तपात थांबवण्यासाठी उपोषण सुरू केले. 13 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी लोकांना भेटून शांततेसाठी प्रयत्न सुरू केले. स्वातंत्र्याच्या काही आठवडे आधी बिहार आणि नंतर बंगालला जाण्याचा त्यांचा बेत होता.
ही बातमी वाचा: