सोशल मिडीयावरील 'जेसीबी की खुदाई' ट्रेण्ड नेमका आहे तरी काय?
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2019 11:53 AM (IST)
सध्या सोशल मिडीयावर 'जेसीबी की खुदाई' या हॅशटॅगचे मिम्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. अनेक जण हा नेमका काय प्रकार आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोशल मिडीयावर कधी काय ट्रेण्ड होईल सांगता येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ट्रेण्ड होत असलेलं #JCBKiKhudai. गेल्या 2-3 दिवसांत सोशल मिडीयावर 'जेसीबी की खुदाई' या हॅशटॅगचे मिम्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. परंतू हे मिम्स नेमके कशामुळे शेअर होत आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फेसबुक आणि ट्विटरवर अनेकांनी याबाबत पोस्ट केल्या आहेत. परंतू या मिम्सची सुरुवात नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेण्याचा अनेकांचा प्रयत्न सुरु आहे. 'जेसीबी की खुदाई' या ट्रेण्डची सुरुवात नक्की कुठे झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता हैदराबादमधून याची सुरुवात झाल्याचं समजतंय. हैदाराबादमधील एका खासदाराच्या एका वक्तव्यानंतर हे सुरु झाल्याचं बोललं जात आहे. "भारतीय लोक बेरोजगार असल्यानं त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो. इतका की एखाद्या ठिकाणी जेसीबीचं काम सुरु असेल तर लोक ते देखील पाहत बसतात", असं वक्तव्य त्या खासदारान केलं होतं. त्यानंतर या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला तेथील काही स्थानिक ग्रुप्सने याबाबतचे मिम्स बनवले परंतू नंतर देशभरात हे मिम्स शेअर व्हायला लागले आहेत. मोठ्या प्रमाणावर हा ट्रेण्ड सुरु असल्याचं पाहून 'जेसीबी' या कंपनीने देखील याची दखल घेतली आहे. 'भारतीय लोकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहोत', असं ट्वीट जेसीबी कंपनीकडून करण्यात आलं आहे.