नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि प्रियांका गांधी यांच्यात पार पडलेल्या बैठकीत या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे.


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जबाबदारी स्वीकारत 25 मे रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो प्रस्ताव सर्व नेत्यांनी फेटाळून लावला. मात्र राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत, अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली होती.


याशिवाय पक्षाचा नवा अध्यक्ष हा गांधी घराण्यातला नको, गांधी घराण्याबाहेरचे नाव सुचवा असेही राहुल गांधींनी म्हटल्याचं समोर आलं होतं. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास दाखवला असला तरी त्यांच्या ऑफिसच्या कार्यशैलीबाबत मात्र काहींनी नाराजी व्यक्त केली होती. निखिल अल्वा, के. राजू, संदीप सिंह यांच्यासारखे राहुल यांचे अनेक सहकारी हे डाव्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे पक्षाची दिशा चुकत असल्याचा अनेकांचा आरोप होता.


काँग्रेस वर्किंग कमिटीच्या या बैठकीत जे लोक चिंतनासाठी बसले होते, त्यापैकी अनेकांना पराभवाचा झटका बसला आहे. राहुल गांधी स्वतः अमेठीतून हरले आहेत. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेदेखील हरले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंह, सुषमासिंह देव हे सर्व काँग्रेसचे बडे नेतेदेखील पराभूत झाले आहेत.


लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला आहे. 2014 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्या तरी कामगिरी अत्यंत निराशजनक आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीतील काँग्रेसचा आक्रमक पवित्रा आणि प्रचार पाहून काँग्रेसला चांगल यश मिळेल अशी आशा होती, मात्र तसं काहीच झालं नाही.


आणखी वाचा 




CWC Meet | अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय इतर नेत्यांचा विचार करा, राहुल गांधींचा प्रस्ताव | ABP Majha