नवी दिल्ली : 2014 नंतर राजधानीत वारंवार दिसणारं चित्र आज पुन्हा दिसलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची एक महत्वाची बैठक आज दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात पार पडली. भाजपच्या, संघाच्या अनेक महत्वाच्या राष्ट्रीय बैठका गेल्या काही काळात सातत्यानं महाराष्ट्र सदनात होत असतात.


आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच संघाचे महत्वाचे पदाधिकारी, केंद्रीय मंत्री यांचा महाराष्ट्र सदनात राबता होता. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संघाचे सह सरकार्यवाह कृष्णगोपाल, संघटन महामंत्री रामलाल, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, प्रकाश जावडेकर, मनेका गांधी, विनय सहस्त्रबुद्धे या बैठकीसाठी उपस्थित होते.

सरकार आणि पक्षाची जनतेतली प्रतिमा यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. विशेषत: डाव्यांच्या बौद्धिक वर्तुळातून जी टीका होतेय, त्याला कसं उत्तर द्यायचं या रणनीतीवर बैठकीत मंथन झालं. इतिहास असो की काही समकालीन मुद्दे अशा प्रश्नांवर डाव्यांना कसं खोडून काढता येईल यावर बैठकीत चर्चा झाली.

जम्मू काश्मीर, नॉर्थ इस्ट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयांवरुन जे हल्ले होतायत त्यावर कसं उत्तर देता येईल याचीही चाचपणी झाल्याचं कळतंय. यात नव्या एज्युकेशन पॉलिसीसारख्या धोरणात्मक विषयांचाही आढावा भाजप-संघानं घेतल्याचं समजतं आहे.

अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्र्यांच्या दिवसभराच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्र सदनाला छावणीचं रुप प्राप्त झालं होतं.

विशेष म्हणजे भाजपचं नवं आलिशान मुख्यालय नुकतंच बांधून झालेलं आहे, पक्षाचं हक्काचं कार्यालय असतानाही अशा राष्ट्रीय बैठकांसाठी महाराष्ट्र सदनाला का पसंती दिली जाते याची खमंग चर्चा दिल्लीच्या वर्तुळात यानिमित्तानं रंगली.