पणजी : गोव्यात निपाह विषाणूचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. हा निपाह विषाणूचाच रुग्ण असल्याचं वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेलं नाही. पण त्याच्याविषयी संशय असल्याने त्याला बांबोळीतील गोमेकॉ अर्थात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे.


आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना याविषयी विचारलं असता, ते म्हणाले की, 'चिंता करण्यासारखं काही कारण नाही. गोमेकॉ रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णाला ठेवण्यात आलं आहे. हा रुग्ण केरळमधून गोव्यात रेल्वेने आला होता. हा रुग्ण गोमंतकीयच आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या केरळमधील भागाला या रुग्णाने मुळीच भेट दिली नव्हती. त्याला स्वत:ला संशय आल्यानंतर त्याने गोमेकॉत धाव घेतली. त्याच्या रक्ताचे नमूने पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येतील.

निपाह विषाणूची लागण झाल्याची काही लक्षणं आढळल्याने संभाव्य धोका पत्करायला नको, या हेतूने आम्ही त्याला देखरेखीखाली ठेवले आहे. पण अजून काही सिद्ध झालेले नाही. पुणे येथे चाचण्या होऊन अहवाल आल्यानंतर बाकीच्या गोष्टी समजतील'.

केरळमध्ये काही भागात निपाह विषाणूने थैमान घातलं आहे. केरळमधील थंड प्रदेशांच्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी बरीच गोमंतकीय कुटुंबं गेली आहेत. त्यापैकी कुणाला निपाह विषाणूची लागण झाल्याचं उदाहरण अजून समोर आलेलं नाही. आता प्रथमच संशयित रुग्ण सापडल्याने गोवा प्रशासनही सतर्क झाले आहे.

केंद्र सरकारने गोव्याला अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच पाठवली आहेत. गोवा सरकारने राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये ही मार्गदर्शक तत्त्वे पाठवली आहेत. कुणालाही निपाहचा संशयित रुग्ण आढळला तर गोमेकॉ रुग्णालयास त्याबाबतची माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे. निपाह विषाणूची लागण झाल्याचे दाखवून देणारे कोणते संकेत असतात, याविषयीही गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने जनजागृती अभियान सुरु केलं आहे.