नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी हा आम्रपाली या देशातील एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अँबेसेडर आहे. आम्रपाली बिल्डरने वेळेत घरं न दिल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे बिल्डरवर दबाव आणण्यासाठी धोनीचा गळा धरण्यात आला आहे. ट्विटरवर धोनीच्या विरोधात मोहिम सुरु करण्यात आली आहे.
आम्रपाली बिल्डर्स आणि कॅप्टन कूल माही यांचं नातं 6 वर्ष जुनं आहे. जेव्हा धोनी स्टार नव्हता, तेव्हा आम्रपाली बिल्डर्सने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी धोनीचाच चेहरा वापरण्यात येतो. मात्र याच नात्यामुळे धोनीचे हात दगडाखाली आले आहेत. आम्रपाली बिल्डरच्या आडमुठेपणामुळे जेरीस आलेल्या ग्राहकांनी ट्विटरवर धोनीविरोधातच मोहीम सुरु केली आहे.
#amrapalimisusedhoni हा ट्रेण्ड ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होता. नॉयडा सेक्टर 45 मधील आम्रपाली सफायर प्रोजेक्टच्या ग्राहकांनी बिल्डरविरोधात शंख फुंकला. त्यानंतर सिलिकॉन सिटी, प्लॅटिनम, झोडिअॅक सारख्या आम्रपालीच्या अन्य प्रकल्पातील ग्राहकांनीही बिल्डरविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.
कोणी फ्लॅट देण्याचा तगादा लावला आहे, तर काही जण अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी मागे लागलं आहे. आम्रपाली बिल्डरसोबत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून असलेलं नातं तोडण्यासाठी धोनीवर दबाव आणला जात आहे.
दरम्यान एका पत्रकार परिषदेत धोनीला आम्रपाली बिल्डरविषयी प्रश्न विचारला असता बिल्डरसोबत या विषयावर बातचित करण्याचं आश्वासन दिलं आहे.