नवी दिल्ली : देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी)चा मार्ग मोकळा झाला आहे. एमबीबीएस, बीडीएस आणि काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सामायिक परीक्षा (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट- सीईटी) ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये दिलेला स्वतःचाच निर्णय खोडून काढला आहे.
एनईईटीबाबत एका रिव्ह्यू पीटिशनच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने या प्रश्नी नव्याने सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. सीईटीची वैधता रद्द ठरवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये दिला होता. याविरोधात मेडिकल काऊन्सिलने पुन्हा कोर्टाचं दार ठोठावलं होतं.
एनईईटी रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांवर हजारो रुपये खर्च करावे लागतील, असा दावा केला जात होता. त्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतानाही विद्यार्थ्यांची धावपळ होते, असंही कोर्टात सांगण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला.
एनईईटीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.